नवी मुंबई - शहरातील घणसोली परिसरातील सिम्प्लेक्स येथे हनुमान सोसायटीच्या इमारतीच्या आवारात पार्क केलेल्या वाहनांना रात्रीच्या सुमारास आग लागली. आगीत दोन रिक्षा आणि सहा दुचाकी जाळुन टाकण्यात आल्या. सुरू असलेल्या प्राथमिक तपासातून आग मुद्दाम लावण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे.
अग्नीशमन दलाने तातडीने कारवाई करुन आग विझवली. त्यानंतर आगीचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू झाला आहे. इमारतीच्या आवारात कुठेही शॉर्ट सर्किट अथवा इंधन गळती झाल्याचे अद्याप दिसलेले नाही. त्यामुळे आग मुद्दाम लावण्यात आल्याची शक्यता व्यक्त होत आहे. याआधी तणाव निर्माण करण्यासाठी अथवा पूर्व वैमनस्यातून मुद्दाम वाहने जाळण्याचे प्रकार नवी मुंबईत घडले आहेत. ही घटना सोमवारी रात्री अडीचच्या सुमारास घडली. यामुळे इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांमध्ये सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे.