ठाणे - लॉकडाउनच्या काळात कडक निर्बंध असतानाही ठाण्यामध्ये बार सुरू असल्याचे उघड झाले होते. याप्रकरणी ठाण्यातील दोन पोलीस निरीक्षकांना निलंबीत करण्यात आले आहे. तर दोन सहायक आयुक्तांची उचलबांगडी करण्यात आली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी कारवाईचे संकेत दिले होते.
तपासणी करुन दिला जायचा बारमध्ये प्रवेश
ठाण्यातील तीन पेट्रोल पंप या परिसरात असलेला अँटिक पॅलेस तर ठाण्याच्या गडकरी रंगायतन जवळच असलेले आम्रपाली, नटराज अशा लेडीज डान्स बारचे एका वाहिनीने स्टिंग ऑपरेशन केले होते. त्यानंतर या ठाण्यातील बारमध्ये 'छमछम' असल्याचा गौप्यस्फोट झाला होता. बारचे मुख्य प्रवेशद्वार बंद ठेवून ग्राहकांना तपासणी करत आत सोडण्यात येत होते. यात पोलीस किंवा पत्रकार नसल्याची खात्री करून मागच्या दरवाजाने एन्ट्री देण्यात येत होती. लॉकडाऊनमध्येही हे डान्स बार जल्लोषात सुरू होते.
ठाण्यातील पेट्रोल पंप येथील अँटिक पॅलेस, गडकरी रंगायतन सर्कल जवळील आम्रपाली नटराज हे बार लॉकडाउनच्या नियमाचे उल्लंघन करत सुरूच असल्याचे स्टिंग ऑपरेशनने समोर आले. त्यानंतर आता हे डान्सबार कुणाच्या संरक्षणात चालतात, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे या स्टिंग ऑपरेशनचा गौप्यस्फोट झाल्याने आता डान्स बार सुरू असलेल्या परिसरातील जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात आली आहे.