ठाणे - ठाण्यात पुन्हा एकदा मोबाईल चोरांमुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी कळवा रेल्वे स्टेशनजवळ एका मोबाईल चोरट्यासोबत झालेल्या झटापटीत एका महिलेचा लोकलखाली पडून मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना याच घटनेची पुन्हा एकदा पुनरावृत्ती घडली आहे. पण यावेळी ही घटना रस्त्यावर घडली. रिक्षाने एक महिला प्रवास करत असताना अचानक दोन बाईकस्वार येतात. बाईकवर मागे बसलेला महिलेच्या हातून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न करतो. पण महिला तो मोबाईल पकडण्याचा प्रयत्न करते. या झटापटीत महिला ही चालत्या रिक्षातून खाली पडते. त्यातच तिला उपचारा दरम्यान मृत्यू होतो. मृत महिलेचं नाव कन्मिला रायसिंग असं असून ती 27 वर्षांची होती.
मोबाईलपायी रिक्षातील तरुणीच्या मृत्युस कारणीभूत ठरलेल्या दोघा दुचाकीस्वारांना नौपाडा पोलिसांनी २४ तासात अटक केली.अल्केश उर्फ परवेझ अन्सारी (२०) व सोहेल अन्सारी (१८) अशी आरोपींची नावे आहेत. दोघेही भिवंडीतील राहणारे आहेत. दोघेही सराईत मोबाईल चोरटे असुन त्यांच्याविरोधात कोनगाव व नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडुन मृतक तरुणीच्या मोबाईलसह तीन मोबाईल, रोकड व एक दुचाकी हस्तगत केली असुन ठाणे सत्र न्यायालयाने दोघांनाही ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी दिली.
मोबाईल सुरू केला आणि आरोपी मिळाले
चोरलेला मोबाईल फोन चालू केल्यानंतर आरोपींनी त्याला दुसरे सिम कार्ड टाकून चालू केला. मग पोलिसांना आरोपींचे लोकेशन मिळाले त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. मृत तरुणीचा मृतदेह अजूनही जवळचे कुटुंबीय न आल्याने कोणालाही दिलेला नाही. मणिपूरवरून त्यांची बहीण आल्यावर त्यांच्या स्वाधीन केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
महिला मृत झाल्याचे चोरट्यांना माहीत नाही
मोबाईल चोरून गेल्यावर चोरटे दुचाकीवरून घोडबंदर रोडला गेले. मात्र, त्यांनी मागे वळून पाहिले नाही. घोडबंदर रोडवरून भिवंडीला गेल्यावरही या दोन्ही आरोपीना ती तरुणी मृत्युमुखी पडल्याचे समजले नव्हते. मात्र, पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर त्यांना हा अपघात झाल्याचे समोर आले आहे .