नवी मुंबई - निसर्ग चक्रीवादळामुळे नवी मुंबई शहरात जोरदार पाऊस सुरु आहे. तसेच चक्रीवादळामुळे जोरदार वारा देखील सुटला आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे मुळासकट उन्मळून पडलेली दिसत आहेत. नवी मुंबईतील नेरुळ परिसरात जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे एका बैठ्या चाळीतील 10 घरांवर वडाचे झाड कोसळले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र, सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही.
हेही वाचा... निसर्ग चक्रीवादळ : मुंबईत ३७ ठिकाणी झाडांची पडझड, तर 10 हजार 840 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
नवी मुंबईतील नेरुळ सेक्टर 2 वारणा कॉलनीमधील बैठ्या चाळीतील 10 घरांवर वडाचे एक मोठे झाड मुळासकट कोसळले. त्यावेळी या घरांमध्ये सुमारे 25 लोक होते. तब्बल दोन तास हे सर्व नागरिक घरात अडकले होते. नवी मुंबई महापालिकेमार्फत मदत पोहचण्यास विलंब झाल्याने सर्वजण घाबरले होते, असा आरोप नागरिकांनी केला आहे. स्थानिक नागरिकांनीच या घरात अडकलेल्या नागरिकांची सुटका केली आहे.
सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही इजा झाली नसून सर्व नागरिक सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, घरांवर झाड पडल्याने या घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. नवी मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून हे झाड हटवण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती नवी मुंबई महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे यांनी दिली.