ठाणे - एका यूट्यूब (youtube) चॅनेलची महिला पत्रकार व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून खंडणी उकळणाऱ्या दोन महिलांसह त्यांच्या एका साथीदाराला ४ लाख रुपये खंडणीच्या गुन्ह्यात भिवंडी तालुका पोलिसांनी अटक केली आहे. विनिता किरण लांडगे, असे अटक केलेल्या महिला पत्रकाराचे नाव असून ती नवी मुंबई परिसरात राहणारी आहे. तर तिच्यासह ह्यूमन राईट संस्थेच्या स्वयंघोषित पदाधिकारी निशा प्रदीप कुरापे (रा. नवी मुंबई) या दोघींसह भीम आर्मीचा पदाधिकारी म्हणून वावरणारा महिला आरोपीचा साथीदार अविनाश गरुड (रा. चेंबूर, मुंबई) यालाही खंडणीप्रकरणी अटक केली आहे.
१५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी
भिवंडी शहरातील रकीब मतलुब खान हे विविध धान्य विक्री करणारे व्यापारी आहेत. त्यांचे गोदाम भिवंडी परिसरात असून हे गोदाम सुरू ठेवण्यासाठी या त्रिकुटाने पत्रकार असल्याची धमकी देत, १५ लाख रुपयांची मागणी व्यापारी रकीब यांच्याकडे केली होती. मात्र तक्रारीचा ससेमिरा उगाच मागे लागायला नको, म्हणून १५ लाख न देता तडजोड करीत ४ लाख देण्याचे आरोपीसोबत ठरवले होते.
यापूर्वीही खंडणीच्या गुन्ह्यात अटक होते आरोपी
गोदाम मालक रकीब यांनी ठरल्याप्रमाणे ४ लाख रुपये खंडणी १ ऑगस्ट रोजी मुंबई-नाशिक महामार्गावर असलेल्या सोनाळे गावात आरोपींनी स्वीकारली होती. याचदरम्यान खंडणी बहाद्दर त्रिकुटावर ७ ऑगस्ट रोजी मुंबई एमआयडीसी पोलिसांनी कारवाई करीत खंडणी मागण्याच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्यानंतर १० ऑगस्ट रोजी फिर्यादी रकीब मतलुब खान यांनी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात या त्रिकुटाविरोधात तक्रार दिल्याने मुंबई येथील गुन्ह्यात जामिनावर या तिघांनी सुटका होताच या तिघांना भिवंडी तालुका पोलिसांनी अटक केली आहे.
तिन्ही आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी
या तिघांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात भादंवि कलम 384, 385, 447, 504, 506प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर गुरुवारी भिवंडी न्यायालयात हजर केले असता १६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती या गुन्ह्याचा तपास करणारे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांनी दिली आहे.