ठाणे - भिवंडीहून प्रवासी घेऊन निघालेल्या चालकाने भरधाव ओमनी व्हॅन बेकरपणे चालवत एका दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या घटनेत दुचाकीवर असलेले एका फायनान्स कंपनीतील मॅनेजराचा दुदैवी मृत्यू झाला आहे. ही घटना भिवंडी - वाडा मार्गावरील पालाखणे गावाच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी गणेशपुरी पोलीस ठाण्यात ओमनी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार झाला आहे. सचिन बबन राऊत ( वय, ३२ रा.आवळे ,भिवंडी) असे अपघातात मृत्यू झालेल्या मॅनेजरचे नाव आहे.
वर्षभरापूर्वीच झाला होता विवाह - भिवंडी तालुक्यातील आवळे गावात मृतक सचिन कुटूंबासह राहत होते. वर्षभरापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. तर भिवंडीतील कल्याण नाका येथील एका फायनान्स कंपनीत मॅनेजर पदावर ते कार्यरत होते. रोजच्या प्रमाणे बुधवारी सायंकाळच्या सुमारास मृत सचिन हे ऑफिसमधील काम आटोपून दुचाकीने घरी निघाले होते.
ओमनी चालक घटनास्थळावरून फरार झाला - भिवंडी - वाडा मार्गावरील पालाखणे गावाच्या हद्दीत दुचाकीवरून जात असताच प्रवासी घेऊन येणाऱ्या बेधुंद अवस्थेतील ओमनी चालकाने पाठीमागून त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. शिवाय दुचाकीसह त्यांना काही अंतरावर फरफटत नेल्याने त्यांच्या छातीला गंभीर दुखापत झाली. मात्र, अपघातानंतर ओमनी चालक घटनास्थळावरून फरार झाला. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने गंभीर जखमी अवस्थेत सचिन यांना प्रथोमोपचारासाठी अंबाडी येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
रुग्णवाहिका बंद पडल्याने रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच मृत्यू - अंबाडी येथील खाजगी रुग्णालयात त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी भिवंडीतील स्व.इंदिरा गांधी उपजिल्हा रूग्णालयात नेत असताना रुग्णवाहिका कवाड गावाच्या हद्दीत अचानक बंद पडली. त्यामुळे रुग्णवाहिका उशिराने रुग्णालयात पोहचल्याने उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे. मृत सचिनच्या पश्चात त्यांचे आई, वडील व भाऊ आणि पत्नीवर दुःखांचा डोंगर कोसळला आहे. तर अपघातात सचिन यांचा दुदैवी मृत्यू झाल्याने ते राहत असलेल्या पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा - Duranto Express: सीएसएमटी ते हावडा जाणारी दुरांतो एक्सप्रेस आज उशिराने धावणार