ठाणे - मागील काही दिवसांमध्ये शहरात सातत्याने कोरोनाबाधित रूग्ण वाढत आहेत. ठाण्यात कोरोनाचे रूग्ण दुप्पट होण्याचा दर पूर्वी दहा दिवसांवर होता. आता त्यात वाढ झाली असून २० दिवसात रुग्णांची संख्या दुप्पट होत आहे. तसेच रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही 47 टक्यांवर आले असून मृत्यू दर 3 टक्क्यांवर रोखण्यात पालिकेला यश आले आहे.
मागील महिनाभरात ठाण्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमालीची वाढली आहे. दररोज 3 ते 5 जणांचा मृत्यूही होत असून ही ठाणेकरांसाठी चिंतेची बाब आहे. रविवार पर्यंत ठाणे शहरात 5 हजार 139 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर सोमवारी हा आकडा 5 हजार 303 वर पोहोचला. आत्तार्पंयत 163 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर 2 हजार 489 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 2 हजार 651 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रूग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण आता 47 टक्यांवर आले आहे. जे मागील महिन्यात 25 टक्क्यांवर होते.
शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी रूग्ण दुप्पट होण्याचा दरही वाढला आहे. अगोदर 10 दिवसांचा असलेला हा कालावधी आता २० दिवस झाला आहे. ही एक सकारात्मक बाब असल्याचे आयुक्तांनी सांगितले. प्रभाग समितींचा विचार केल्यास लोकमान्य-सावरकर नगरमध्ये दुपटीचा दर हा 37.6 टक्के एवढा झाला आहे. याचाच अर्थ येथे रुग्णवाढ कमी करण्यात पालिकेला यश आले आहे. तर मुंब्य्रातही रूग्ण वाढीचा वेग मागील दहा दिवसात कमी झाल्याने दुपटीचा दर 25.7 टक्के एवढा झाला आहे. तर दिवे 23.5, वागळे इस्टेटमध्ये 20.7, नौपाडा कोपर 25.2, वर्तकनगर 19.7, उथळसर 18.8, कळवा 17.1, माजिवडा, मानपाडा 13 टक्के एवढा आहे, अशी माहिती आयुक्तांनी दिली.
रूग्णसंख्या सातत्याने वाढत असताना दुसरीकडे रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे. लोकमान्य सावरकरनगरमध्ये रूग्ण वाढीचा वेग 2.8 टक्के असून रूग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 34 टक्क्यांवर आले आहे. तर वागळे इस्टेटमध्ये रुग्णवाढीचा वेग 3.5 टक्के असून रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 59 टक्के , मुंब्य्रात रुग्णांचे प्रमाण 4.6 टक्के असून कोरोनावर मात केलेल्याची संख्या 28 टक्के आहे. कळव्यात रुग्णांचे प्रमाण 2.1 टक्के असून बरे होण्याचे प्रमाण 42 टक्के आहे. माजिवडा मानपाडामध्ये 4.3 टक्के रूग्ण असून रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 61 टक्के, नौपाडा, कोपरीत 1.7 टक्के रूग्णवाढीचे प्रमाण असून बरे होण्याचे प्रमाण 31 टक्के झाले आहे. उथळसरमध्ये 3.2 टक्के रूग्णवाढ असून 44 टक्के रूग्ण बरे झाले आहेत. तर वर्तकनगरमध्ये 2.9 टक्के रूग्णवाढ असून कोरोनावर मात करणाऱयांचे प्रमाण 41 टक्के आहे. दिव्यात रूग्ण वाढीचे प्रमाण 1.8 टक्के असून रूग्ण बरे होण्याचे प्रमाण तब्बल 99 टक्के एवढे आहे.