ठाणे - शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडीला बेवारस दुचाकी आणि चारचाकी वाहने कारणीभूत ठरत होती. अशा वाहनांविरोधात ठाणे वाहतूक शाखेने कारवाई करताना २०१८ ते एप्रिल २०१९ पर्यंत जवळपास ८०० बेवारस गाड्यांना शीळ डायघर येथील मैदानात भंगार म्हणून जमा केले आहे. या गाड्यांचा लवकरच लिलाव होणार आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिका आणि वाहतूक शाखेने रस्त्यावर उभ्या असलेल्या भंगार गाड्या उचलून रस्ते मोकळे केले. आता ठाणे वाहतूक शाखेचे उपायुक्त अमित काळे यांच्या पुढाकाराने ठाणे आयुक्तालय क्षेत्रातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात असलेल्या भंगार बेवारस गाड्यांवर कारवाई करण्यात आली आहे. गाड्यांमुळे मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी बरोबरच पादचाऱ्यांनाही चालण्यास त्रास होत होता. याची नोंद घेत ठाणे वाहतूक शाखेचे उपायुक्त यांनी अशा बेवारस गाड्यांच्या मालकांना अनेकदा नोटीस पाठवून गाड्या हटविण्याची विनांती केली होती. परंतु, मालकांनी याकडे लक्ष दिले नाही.
त्यामुळे वाहतूक शाखेने धडक कारवाई करत या गाड्या हटवून रस्ते मोकळे केले. गेल्या वर्षी सुरु झालेल्या या मोहिमेअंतर्गत एप्रिल २०१९ पर्यंत जवळपास ८०० गाड्या हटविण्यात आल्या आहेत. सदर गाड्या जुन्या शीळ डायघर पोलीस स्थानकाच्या मागील मैदानात ठेवण्यात आल्या आहेत. या मोहिमेमुळे ठाण्यातील रस्ते मोकळे झाले असून वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली आहे. सर्व रस्ते मोकळे होईपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे, अशी माहिती वाहतुक शाखेचे उपायुक्त अमित काळे यांनी दिली.