ठाणे - जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. खाड्यांमध्ये भरतीचा मोसम असूनही अवैध धंद्यांना ऊत आला आहे. नुकतीच उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन घुले यांनी बोटीच्या साहाय्याने देसाई खाडीत बेकायदेशीर हातभट्टीवर धडक कारवाई केली. या कारवाईत २ लाख ४० हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच हातभट्टीतील साहित्य पाण्यातच उध्वस्त केले.
खाडी किनाऱ्यावरून बऱ्याच अंतरावर असलेल्या तिवराच्या झाडांच्या आडोशाला डोंबवली देसाई खाडीत हातभट्टी सुरू असल्याची माहिती ठाणे उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन घुले यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीची खातरजमा केली. नंतर मुसळधार पावसात खाडीत भरती आणि पाण्याचा प्रवाह जास्त असतानाही ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक एका छोट्या रबरी बोटच्या साहाय्याने काही अंतरापर्यंत समुद्राच्या पाण्यात गेले. त्यानंतर बराच काळ पुढे पोहत जाऊन नितीन घुले आणि त्यांच्या टीम घटनास्थळी पोहोचली. समुद्रकिनार्यापासून बऱ्याच अंतरावरवर तिवरांच्या झाडांमध्ये लपून एक मोठी हातभट्टी चालवली जात होती. त्या हात भट्टीवर धडक कारवाई करण्यात आली. या बेकायदेशीर हातभट्टीवर ९२ हजार ८०० लिटर मद्य बनविण्यासाठी लागणारे रसायन, ४४६ ड्रम आणि लोखंडी ढोल असा जवळपास २ लाख ४० हजाराचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क पथकाने हस्तगत केला.
भर पावसात बोटीच्या सहाय्याने पथकाने केलेली ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. खाडीत तरंगणारे रसायनाचे ड्रम पथकाने पाण्यातच उध्वस्त करून पुन्हा वापरात येणार नाही, याची दक्षता बाळगल्याची माहिती ठाणे उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन घुले यांनी दिली.