ठाणे - ठाणे रेल्वे स्थानकावर नवीन रेल्वे पूल, प्रत्येक प्लॅटफॉर्मवर सरकते जीने, लिफ्ट आदी अनेक सुविधा प्रवाशांसाठी दिल्या असताना, आता रेल्वेने अंध प्रवाशांना ठाणे स्थानकाची संपूर्ण माहिती समजावी म्हणून, ब्रेल लिपीत फलक लावले आहेत. अनेकदा स्थानकाचा भौगोलीक नकाशा अंधांना समजून येत नाही आणि गर्दीच्या वेळी मार्ग काढताना दृष्टिहीन प्रवाशांची तारेवरची कसरत करावी लागत होते. या पार्श्वभूमीवर दृष्टिहीनांसाठी स्थानकाची माहिती समजावी यासाठी ब्रेल लिपीचे फलक सर्वत्र लावण्यात आले आहेत. या ब्रेल फलकांचा दृष्टिहीना प्रवासी लाभ घेत असून त्यांचा हा रेल्वे प्रवास सुखकर होत आहे.
मुंबईनंतर झपाट्याने वाढणारे शहर म्हणजे ठाणे शहर आणि या शहरातून मुंबईकडे कामानिम्मित जाणारी लोक ही खूप आहेत. ठाणे रेल्वे स्थानकावरून जवळपास आठ लाख लोक प्रवास करतात. गर्दीच्यावेळी सामान्य लोकांना प्रवास करणे शक्य होत नाही, त्यात सर्वसामान्य माणसाप्रमाणे दिव्यांगं व्यक्ती खांद्याला खांदा लावून काम करताना, रेल्वे प्रवासावेळी दृष्टिहीन प्रवाशांना अडचणी येणार नाही याची काळजी रेल्वे प्रशासनाने घेतली आहे. ठाणे स्थानकात काही दिवसांपूर्वी स्थानकातील प्लॅटफॉर्म, रेल्वे पूल, सरकते जीने कार्यालय, लिफ्ट, शौचालय आदींची सर्व माहितीचे फलक ब्रेल लिपीत लिहिल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. दृष्टिहीन प्रवाशांच्या सोयीसाठी प्लँटफॉर्म क्रमांक 10 जवळील तिकीट घरात ब्रेल लिपीत स्थानकाचा संपूर्ण नकाशा काढला आहे. या सोबतच प्लॅटफॉर्म, रेल्वेपूल, शौचालय, कार्यालय, वेटिंगरम, स्टेशन मॅनेजर, सरकते जीने, लिफ्ट आदी सर्व ठिकाणी ब्रेल लिपीत फलक लावले आहेत. त्यामुळे दृष्टिहीन प्रवाशांना याचा मोठा फायदा होतो आहे.
ऐतिहासिक रेल्वे स्थानक म्हणून गौरविले जाणाऱ्या ठाणे स्थानकाचा चेहरामोहरा बदलण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून केले जात आहे. आजच्या धावपळीच्या दिवसात वेळेला खूप किंमत आहे. त्यातच घाईगर्दीत रेल्वेचा प्रवास करताना एक मिनिटांची फुरसत नसते. अशावेळी अंध व्यक्तींना स्थानकाची माहिती हवी असल्यास ब्रेल लिपीचे फलक मोठी भूमिका बजावू शकतात. ठाणे रेल्वे स्थानकाची दृष्टिहीन व्यक्तींसाठी ब्रेललिपीत महत्वाची माहिती दिलेली आहे. त्याचा दृष्टिहीन व्यक्तींना निश्चितच फायद्याचा ठरणार असल्याचे रेल्वे प्रवाशी संघटना पदाधिकारी सांगत आहेत. ठाणे स्थानकावरील गर्दी प्रचंड वाढली असून अशावेळी ब्रेललिपीत फलकाचा आम्हला चांगला फायदा होतो. आम्हाचा प्रवास सुखात होत आहे. नवीन अंधव्यक्ती फलकावर गेला तरी त्याला ब्रेललिपीत फलकामुळे माहिती मिळते आणि वाट काढताना भीती वाटत नाही, असे प्रवाशी शिवम पाटील यांनी सांगितले.
मोठा दिलासा मिळाला - माहितीचे फलक ब्रेल लिपीत लिहिल्याने दिव्यांगना मोठा दिलासा मिळाला असला तरी प्लॅटफॉर्म वरील दिव्यांग डब्यासमोर बिप साउंड सिस्टीम अनेकदा बंद असते. तसेच स्थानकातील पाच पूल एकमेकांना जोडलेले नसल्याने त्रास होत असून प्लॅटफॉर्म तसेच महत्वाच्या ठिकाणी साउंड सिस्टम असावी, अशी मागणी दृष्टिहीन व्यक्तींनी केली आहे.
सर्वच स्थानकामध्ये अशी सुविधा असावी - दृष्टिहीन प्रवाशांसाठी ही व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर आणि ठाणे या स्थानकांवर पाहायला मिळते. ही सुविधा राज्यातील आणि देशातील सर्व स्थानकावर असावी, अशी मागणी ठाण्यातील प्रवासी संघटनांनी केलेली आहे. अशाच प्रकारच्या सर्व सेवा दिव्यांगांसाठी सर्वच स्थानकामधे उपलब्ध असाव्यात जेणेकरून त्यांना रेल्वेचा प्रवास करणे सुखकर होईल, अशी मागणी प्रवासी संघटना करत आहेत.
आजही सरकते जीने बंद - आजही ठाण्यातील स्थानकांमध्ये असलेले काही सरकते जिने हे बंद आहेत आणि हे बंद जिने दिव्यांगांना व वृद्धांना त्रास देण्याचे काम करतात. या सुविधा अंध अपंगांना कायमस्वरूपी मिळाव्यात यासाठी झालेला खर्च हा वाया गेला आहे, आता असे वाटू लागले आहे. यामुळे आमच्या अडचणी आम्हीच सोडावतो, असे काही दिव्यांग प्रवाशांनी सांगितले.
हेही वाचा - Mystery Of Suicide : तरुणीची हत्या की, आत्महत्या! बदलापूर रेल्वे रुळावर सापडला मृतदेह