ठाणे : मुंब्रा भागातील कौसा परिसरात असलेल्या प्राईम क्रिटी केअर रुग्णालयाला आज पहाटे तीनच्या सुमारास आग लागल्याची घटना समोर आली. धक्कादायक बाब म्हणजे भांडुप, विरार पाठोपाठ याही रुग्णालयात उपचार घेणाऱ्या चार रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक आमदार तथा मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
रुग्णांचा मृत्यू आगीमुळे नाही, तर स्थलांतर करताना..
दरम्यान, या दुर्घटनेत दगावलेल्या रुग्णांचा मृत्यू आगीमुळे नव्हे तर स्थलांतर करताना उपचार न मिळाल्याने झाल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णालयात एकूण २० रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यांपैकी जनरल वॉर्डमध्ये १४ तर आयसीयूमध्ये सहा रुग्ण होते. ठाणे मनपाने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.
मृतांची नावे..
- यास्मीन सय्यद (४६)
- नवाब शेख (४७)
- हलिमा सलमानी (७०)
- हरीश सोनावणे (५७)
शॉटसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज..
मुंब्रा भागातील कौसा परिसरात असलेल्या प्राईम रुग्णालयात आगीची घटना घडली त्यावेळी २० रुग्णांवर उपचार सुरु होते. मात्र त्यातच आज पहाटे तीनच्या सुमारास अचानक शॉटसर्किट होऊन आग लागल्याचा अंदाज मंत्री आव्हाड यांनी व्यक्त केला आहे. तर मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना पाच लाखांची आर्थिक मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र या आगीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करून संबधित दोषींवर कारवाई करण्यात येईल अशीही माहिती मंत्री आव्हाड यांनी दिली आहे.