ठाणे - खोट्या केसमध्ये अडकवून कोट्यवधींची खंडणी वसुली प्रकरणी अखेर ठाणे नगर पोलीस ठाण्यात तत्कालीन ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. परमबीर यांच्यासह एकूण 28 जणांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये काही पोलीस अधिकारी आणि ठाण्यातील एका समाजसेवकाचाही समावेश आहे. हा गुन्हा दाखल झाल्यामुळे परमबीर सिंग यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढल्या आहेत. परमबीरसिंह यांच्या विरोधात पाच प्रकरणात गुन्हे दाखल झाले आहेत.
तक्रारदार केतन तन्ना, सोनू जालान आणि रियाज भाटी या तिघांनी परमबीरसिंग आणि त्यांचे २७ सहकाऱ्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. ठाणे नगर पोलिसांनी गुरुवारी सोनू जालान यांचा जबाब नोंदविला होता. तर शुक्रवारी केतन तन्ना आणि रियाज भाटी यांचा जबाब नोंदवून अखेर ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
रवी पुजारी आरोपी
या खंडणी प्रकरणामध्ये 28 आरोपींमध्ये रवी पुजारी हा सुद्धा एक आरोपी आहे याचा अर्थ पोलिसांनी आणि परमबीर सिंग यांनी रवी पुजारी यांच्या नावाचा वापर करत अनेक लोकांकडून खंडणी वसूल केलेली आहे, असा आरोप यावेळी केतन यांनी केला आहे.
100 कोटी वसुलीचा माजी गृहमंत्र्यांवर आरोप केला होता
मार्च महिन्यात मुंबई पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंह यांची बदली होमगार्डच्या पोलीस महासंचालक पदावर करण्यात आली. त्यानंतर त्यांनी राज्याच्या गृहविभागाच्या कारभारवर बोट ठेवत तात्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर100 कोटी रुपये वसुलीच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. त्यानंतर मात्र परमबीर यांच्याविरोधातही तक्रारी समोर येऊ लागल्या आणि 5 प्रकरणात गुन्हे दाखल झाले आहेत.