ठाणे - खाकी वर्दीवाल्यांनी स्वतःची पदरमोड करून ३०० मजुरांची भूक भागवली आहे. त्यामुळे खाकी वर्दीवाल्यांची माणुसकी पाहून त्या 300 मजुरांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून केंद्र सरकराने लॉकडाऊन घोषित करून आज ३६ दिवस झाले. या दिवसात हातावर पोट असणाऱ्या हजारो कुटुंबाना विविध राजकीय, सामाजिक कार्यकर्ते पोलिसांच्या मदतीने अन्नधान्य वाटप करीत आहेत. असाच काहीसा प्रयत्न करीत गरिबांना अन्नधान्य वाटप करण्यासाठी कोनगाव पोलिसांचा सहभाग समोर आला आहे.
ठाणे जिल्ह्यातील कोनगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश काटकर यांच्या संकल्पनेतून पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी वर्गणी गोळा केली. त्यांनतर जमा झालेल्या वर्गणीच्या रकमेतून पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धर्मा निवास चाळ येथील हातावर पोट असणाऱ्या २५० ते ३०० गरीब कुटुंबाना धान्य वाटप केले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रमेश काटकर , पोलीस निरीक्षक साबळे (गुन्हे) सह पोलीस निरीक्षक सुर्यवंशी, पोसई, शेरखानेंसह अन्य पोलीस कर्मचारी यांच्या हस्ते मजुरांना अन्नधान्य वाटप करण्यात आले.