ठाणे - महानगरपालिकेने सोमवारी नौपाडा प्रभाग समिती परिसरातील जांभळी नाका मुख्य भाजीपाला मार्केट, कळवा नाका, हाजुरी, जवाहरबाग येथील जवळपास २५० पेक्षा जास्त अनधिकृत हातगाड्यांवर व फेरीवाल्यांवर कठोर कारवाई केली. यात पाच टेम्पो सामानासह जप्त करण्यात आले तर सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्या ११ दुकानांवर कारवाई करण्यात आली. तसेच ७ हातगाड्या तोडून टाकण्यात आल्या.
शहरातील हॉटस्पॉट आणि प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. हॉटस्पॉट आणि प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना सर्व परिमंडळ उपआयुक्त आणि सहायक आयुक्तांना दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर नौपाडा प्रभाग समितीतंर्गत सोमवारी मध्यरात्री १ वाजल्यापासून ते सकाळी ९ या कालावधीत अनधिकृत हातगाडीवाले आणि फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करण्यात आली.
उप आयुक्त संदीप माळवी आणि नौपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त प्रणाली घोंगे यांनी पोलीस आणि अतिक्रमण निष्कासन पथकाच्या साहाय्याने कारवाई केली. अशा प्रकारची कारवाई लॉकडाऊन संपेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने दिले आहेत. जे लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई चे आदेशपत्र सर्वच प्रभाग समित्यांना दिल आहे.