ठाणे - ठाणे शहरात गेल्या अनेक महिन्यापासून अनधिकृत बांधकामे आणि फेरीवाल्यावर धडक कारवाई सुरू आहे, असे असताना ही कारवाई थांबवण्यासाठी मला केंदीय मंत्र्यांचे फोन आले असल्याचे खळबळजनक विधान ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी सर्वसाधारण सभेत केले. महापौर म्हस्के यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात जोरदार खळबळ उडाली. मात्र मला कुठूनही आणि कितीही फोन आले तरी अनधिकृत बांधकामांसंदर्भात कारवाई सुरूच राहील, असे स्पष्टीकरण म्हस्के यांनी यावेळी दिले. मात्र, फेरीवाल्यांच्या विरोधातील कारवाई थांबविण्यासाठी फोन करणारा तो केंद्रीय मंत्री कोण? हे महापौरांनी सांगावेच असे आव्हान आता भाजपाकडून देण्यात आले आहे. त्यावर मात्र महापौर आता बोलण्यास टाळताना दिसत आहेत.
कृष्णा पाटील यांनी उपस्थित केला सवाल-
गेल्या काही दिवसांपासून शहरात अनधिकृत बांधकामे आणि फेरीवाल्याविषयीचा प्रश्न गंभीर असताना राजकारण तापू लागले आहे. फेरीवाल्यावर कारवाई दरम्यान सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला करण्यात आला. मात्र हा हल्ला अनधिकृत बांधकामांवर केलेल्या कारवाईमुळेच झाला होता, असा खुलासा पिंपळे यांनी केला होता. त्यामुळे अनधिकृत बांधकामांचा प्रश्न अधिकच चिघळला गेल्याने सोमवारी भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांनी यासंदर्भात सभागृहात प्रश्न उपस्थित केला. पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण, मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अनधिकृत बांधकामाच्या संदर्भात काय पत्रव्यवहार केला आहे. तसेच बांधकामे तोडण्याच्या संदर्भात पालकमंत्र्यांचे काय आदेश आहेत. या आदेशाची प्रत मिळावी, अशी मागणी यावेळी कृष्णा पाटील यांनी केला होती.
केंद्रीय मंत्र्याचे नाव सांगण्यास टाळाटाळ-
महापौर नरेश म्हस्के यांनी कृष्णा पाटील यांच्या प्रश्नावर आक्षेप घेत पालकमंत्री किंवा गृहनिर्माण मंत्री यांनी प्रशासनासोबत काय पत्रव्यवहार केला हे सांगणे बांधकारक नाही. तसेच प्रश्न घायचा की नाही हा अधिकार महापौरांचा असल्याचा खुलासा महापौरांनी केला. पालकमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री हे सभागृहाचा भाग नसल्याचे सांगत त्या प्रत्येकाचा आदर राखला पाहिजे, असे त्यांनी सभागृहात सांगितले. दरम्यान अनधिकृत बांधकामे वाचवण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांचेच फोन आले असल्याची खळबळजनक माहिती यावेळी महापौरांनी दिली. मात्र कोणत्या मंत्र्यांचे फोन आले, त्या मंत्र्याचे नाव म्हस्के यांनी जाहीर केले नाही. त्यामुळे अनधिकृत बांधकामांवर कारवाई थांबावणारा केंदीय मंत्री कोण याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आता मात्र या विषयी बोलण्यास महापौरांनी टाळाटाळ सुरु केली आहे.
मंत्र्यांच्या कार्यवाहीबाबत विचारला सवाल-
अनधिकृत बांधकामाबाबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांनी कोणता पत्रव्यवहार केला असेल तर त्यांनी त्याचा खुलासा करण्यासंदर्भात भाजपाच्या नगरसेवकांनी महासभेत थेट प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नावर थातूरमातूर उत्तर दिल्याचा आरोप भाजप नगरसेवक पाटील यांनी केला आहे. त्याचबरोबर नगरसेवक पाटील यांनी थेट महापौरांना त्यांनी केंद्रीय मंत्री याचे नाव सांगण्याचे आव्हानच केले आहे. त्याच बरोबर सत्ताधारी शिवसेना अधिकाऱ्यांची बदली करून चुकीचे काम करत असल्याचा आरोप देखील भाजपाचे नगरसेवक कृष्णा पाटील यांनी केला आहे.