ठाणे - भारतीय स्वातंत्र्याचा ७२ वा वर्धापनदिन समारंभ ठाणे जिल्हाधिकारी प्रांगणात पार पडला. जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाण्याचे महापौर, आयुक्त, खासदार, आमदार व इतर मान्यवर उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, विद्यार्थी, नागरिक यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
नियोजन भवन सभागृहात झालेल्या कार्यक्रमात बोलतांना पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, या वर्षीचा स्वातंत्र्य दिन हा विशेष आहे. 370 व 35 ए हा कलम रद्द झाल्याने देशात आनंदाचे वातावरण असून काश्मिरी बांधवाना मुळ प्रवाहात आणणे गरजेचे आहे. पूरपरिस्थितीत महालक्ष्मी एक्सप्रेस मध्ये अडकलेल्या हजारो प्रवाशांना सुखरुप बाहेर काढल्याबद्दल तसेच जिल्ह्यात महापुरात अडकलेल्यांना मदतीचा हात दिल्याबद्दल जिल्हा प्रशासन, मदत पथके, पोलीस दल, सेवाभावीसामाजिक संस्था, स्थानिक नागरिक यांचे त्यांनी अभिनंदन केले.
पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी सन 2018 मध्ये केलेल्या प्रशंसनीय सेवेबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते बोध चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व राष्ट्रीय प्रज्ञा शोध राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. वन विभाग व सामाजिक वनीकरण ठाणे यांचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार 2017 महसुल विभाग ठाणे अंतर्गत व्यक्ती, शैक्षणिक संस्था यांना पुरस्कार प्रदान करुन गौरविण्यात आले. सन 2017-18 व 2018-19 चे गुणवंत खेळाडू पुरस्कार, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, गुणवंत क्रीडा कार्यकर्ते, संघटक यांना जिल्हा क्रीडापुरस्कार प्रदान करुन गौरविण्यात आले.