नवी मुंबई : दिघा परिसरात १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर त्याच विभागात राहणाऱ्या १८ वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. संबंधित मुलगी गरोदर असल्याने ही घटना उघडकीस आली. संबंधित तरुणास पॉस्को अंतर्गत रबाळे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.
मुलीला धमकावून आरोपी करत होता लैंगिक अत्याचार..
संबंधित १३ वर्षीय पीडित मुलगी डोंबिवली येथे राहण्यासाठी होती. लॉकडाऊन काळात आईवडील गावी जाणार असल्याने संबंधित मुलगी तिच्या दिघा येथे राहणाऱ्या आजीकडे आली होती. ही मुलगी शिवणक्लासला जात असताना, १८ वर्षीय आरोपीने मुलीशी गोड बोलून मैत्री केली, आणि नंतर तिला मित्राच्या घरी नेऊन धमकावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर मुलीला ब्लॅकमेल करून, आरोपीने हा अत्याचार सुरूच ठेवला.
मुलीच्या पोटात दुखू लागल्याने प्रकार उघडकीस..
काही दिवसांनी मुलगी तिच्या घरी डोंबिवली येथे परतली असता, तिच्या पोटात दुखू लागले. तिला डॉक्टरकडे तपासणीसाठी नेले असता संबंधित मुलगी गरोदर असल्याचे समोर आले. याप्रकरणी मुलीकडे विचारपूस केली असता, आजीकडे गेली असताना तरुणाने तिच्यावर जबरदस्ती करून लैंगिक अत्याचार केल्याचे तिने सांगितले. मुलीच्या आईने रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत तरुणाच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल केली.
अवघ्या ४८ तासात आरोपी गजाआड..
संबधीत आरोपीस अवघ्या ४८ तासात राहत्या घरातून अटक करण्यात आली. या बलात्कार प्रकरणी त्याच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी रबाळे पोलीस स्टेशनच्या सपोनि रईसा शेख अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचा : पोटच्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा नराधम बाप गजाआड