ठाणे - ठाण्यातील राबोडी परिसरात मनसेच्या पदाधिकाऱ्याची डोक्यात गोळी घालून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. यामागे राजकीय वैमनस्य आहे, की दुसरे कारण, याचा शोध ठाणे पोलीस घेत आहेत. आज दुपारच्या सुमारास ही हत्या झाली. जमील शेख असे हत्या करण्यात आलेल्या मनसे पदाधिकाऱ्याचे नाव आहे.
या हत्येमागे राजकीय वैमनस्य होते की या परिसरात होणाऱ्या क्लस्टर डेव्हलपमेंट वादातून हत्या झाली, याचा शोध आता स्थानिक पोलिस घेत आहेत. पोलिसांना या संदर्भामध्ये काही पुरावे देखील मिळालेले आहेत. त्याचा वापर आता तपासामध्ये केला जाणार आहे. घटनास्थळी पोलिसांनी तणाव वाढू नये म्हणून मोठा बंदोबस्त लावलेला आहे. आरोपीला लवकरात लवकर शोधून त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी मनसेने केली आहे.
2015 पासून संरक्षणासाठी केले होते पोलिसांकडे अनेक अर्ज -
जमील शेख यांच्यावर याआधीही अनेकदा जीवघेणे हल्ले झाले होते. त्याच्यामध्ये तो गंभीर जखमी देखील झाले होते. त्यांनी या संदर्भात राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. 2015 साली जमील शेख यांनी संरक्षणासाठी पोलिसांकडे अर्ज देखील केला होता. मात्र हा अर्ज पोलिसांकडून फेटाळण्यात आला होता. पोलिसांचा हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप त्याचे कुटुंबीय करत आहेत.