ठाणे - सफेद रॉकेलचा साठा करण्याबाबत कोणताही परवाना नसताना पर्यावरणास हानिकारक असलेल्या ज्वलनशील सफेद रॉकेलचा तब्बल २२ हजार ३६० लिटरचा साठा नारपोली पोलिसांनी एका गोदामातून जप्त केला आहे. या रॉकेलची एकूण किंमत १० लाख ७३ हजार २८० रुपये आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गोदाम मालक, चालकासह राँकेलची वाहतूक करणाऱ्या दोन वाहन चालकांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्रामपंचायत क्षेत्रातील जय मातादी कंपाऊंड येथील विजय छाया इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या गोदामात बेकायदा सफेद राँकेलचा साठा असल्याची माहिती खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुरुवारी या गोदामावर छापा टाकला होता. त्यावेळी प्लास्टिक व लोखंडी ड्रम व बॅरेलमध्ये हे सफेद रॉकेल साठवणूक केल्याचे आढळून आले.
त्याबाबत कोणताही परवाना चौकशीत त्यांच्याकडे आढळून न आल्याने कंटेनर क्रमांक MH 46 AR 2477 चा चालक लक्ष्मण चिमा डोंगरे ( रा.पारनेर अहमदनगर ), टेम्पो क्रमांक MH 04 KF 324 चा चालक गोविंद राठोड ( रा.राहनाळ ता.भिवंडी ), गोदाम चालक पंकज म्हात्रे व गोदाम मालक नयन पाटील ( दोघे रा. काल्हेर ) व माल विकत देणारा शैलेश दुधेला ( रा.मुंबई ) यांना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक व्ही बी आव्हाड हे करत आहेत.