ठाणे - लॉकडाऊन वाढल्याने शनिवारी मध्यरात्री भिवंडी रोड रेल्वे स्थानकातून गोरखपूरला एक हजार १०४ कामगारांना घेऊन श्रमिक ट्रेन रवाना झाली आहे. त्या पाठोपाठ भिवंडीत राहणाऱ्या राजस्थानातील जयपूर मधील कामगारांनाही गावी जाण्यासाठी श्रमिक ट्रेनची व्यवस्था ट्रेन सोमवारी रात्रीच्या सुमारास १ हजार २११ कामगार प्रवाशांना घेऊन जयपूरला रवाना झाल्याची माहिती भिवंडीचे पोलीस उपआयुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली आहे.
हेही वाचा... टाळेबंदीची कडक अंमलबजावणी करा, मे अखेरपर्यंत राज्य ग्रीन झोनमध्ये हवे - मुख्यमंत्री ठाकरे
कामगार नगरी म्हणून ओळख असलेल्या भिवंडी शहरात देशाच्या विविध राज्यातील हजारो कामगार यंत्रमाग कारखान्यात काम करूंन आपल्या कुटुंबाचा उदर्निवाह करीत होते. मात्र कोरोना व्हायरसच्या पार्शवभूमीवर देशात लॉकडाऊन तिसऱ्यांदा घोषित केल्याने गेल्या दीड महिन्यापासून यंत्रमाग कारखाने बंद आहेत. त्यामुळे लाखो कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच शेकडो कामगार विविध राज्यात आपल्या गावी जाण्यासाठी पायीच निघाले आहेत. आजही कामगारांचे जथ्ये मुंबई - नाशिक महामार्गावरून उन्हातुन पायपीट करीत असल्याचे दिसून येत आहेत.
राज्य शासनाने केंद्र सरकारकडे गावी जाणाऱ्या कामगारांसाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करावी, अशी मागणी केली होती. यावर केंद्र सरकारने महाराष्ट्रातील विविध रेल्वे स्थानकातून पर राज्यातील कामगारांसाठी श्रमिक ट्रेन सुरु करण्यास परवागी दिली. त्यानुसार शनिवारीच भिवंडी रोड रेल्वे स्थानकातून उत्तर प्रदेश राज्यातील गोरखपूर येथे १ हजार १०४ कामगारांना श्रमिक ट्रेन मधून रवाना करण्यात आले. आता यापाठोपाठ भिवंडीत राहणाऱ्या राजस्थान मधील जयपूर मधील कामगारांनाही गावी जाण्यासाठी सोमवारी रात्रीच्या सुमाराला १ हजार २११ कामगार प्रवाशांना घेऊन जाणारी श्रमिक ट्रेन सोडण्यात आली आहे.
दरम्यान, गोरखपूर, जयपूर पाठोपाठ आता बिहार राज्यातील पटना येथील कामगारांना घेऊन जाणारी श्रमिक ट्रेन भिवंडी रोड रेल्वे स्थानकातूनच सुटणार असल्याची माहिती भिवंडीचे पोलीस उपआयुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली आहे. तर रेल्वे स्थानकात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भिवंडी रेल्वे स्थानक परिसरात मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तर स्थानकातही लोहमार्ग पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता.