ठाणे- एका लग्न समारंभासाठी मंगल कार्यालयामध्ये सजावटीचे काम सुरू असताना या कार्यालयामध्ये अचानक एक विषारी घोणस घुसला. त्यामुळे येथील कामगारांना चांगलाच घाम फुटला आणि ते सैरावैरा पळू लागले. ही घटना कल्याण पश्चिमेकडील भगीरथी नगर परिसरातील मंगल कार्यालयामध्ये घडली आहे.
भक्ष्याच्या शोधात विषारी-बिन विषारी सापांनी बदलत्या वातारणामुळे मानवी वस्तीत शिरकाव केला आहे. गेल्या ३ महिन्यात सर्पमित्रांनी कल्याण पश्चिमेकडील मानवी वस्तीतून शेकडो साप पकडून जंगलात सोडल्याचे समोर आले. कालच कल्याण पश्चिमेकडील डॉन बास्को स्कुल शेजारी असलेल्या बिस्लेरीच्या गोदामात ७ फुटाचा साप भक्ष्य शोधण्यासाठी शिरल्याची घटना घडली असतानाच, आज दुपारच्या सुमाराला भगीरथीनगर परिसरातील मंगल कार्यालयामध्ये एका लग्न समारंभाच्या सजावटीचे काम सुरू असताना विषारी साप मंडपात घुसला. मंडपात साप शिरल्याची माहिती मिळताच सर्वच कामगारांनी मंगल कार्यालयामधून पळ काढला. त्यानंतर हॉलच्या व्यवस्थापकाने वार संस्थेचे सर्पमित्र दत्ता बोंबे यांना संर्पक करून मंगल कार्यालयामध्ये विषारी घोणस साप घुसल्याची माहिती दिली. सर्पमित्र बोंबे घटनास्थळी येऊन त्यांनी विषारी पकडून सोबत आणलेल्या पिशवीत बंद केला.
दरम्यान, हा विषारी साप घोणस जातीचा असून ४ फुटाचा आहे. या विषारी सापाला कल्याण वन अधिकाऱ्यांच्या परवानगीने जंगलात सोडणार असल्याची माहिती सर्पमित्र बोंबे यांनी दिली.