ठाणे - ठाण्यात तिघांकडून एलएसडी पेपर, एमडी, चरस, गांजा आदीसह सहा प्रकारचे ड्रग्स पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अयुब अन्सारी (रा. भिवंडी), हुसेन रजानी (अंधेरी, मुंबई) आणि नॅश उर्फ नबी शेख (चेंबूर) या तिघांना अटक केली आहे.
17 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
ठाण्यात काही इसम ड्रग्ज विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा युनिट पाच (वागळे) वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा लावून आयुब अन्सारी यास अटक केली. तर त्याच्या चौकशीतून आणखी दोघांची नावे समोर आल्याने पोलिसांनी त्यांना देखील बेड्या ठोकल्या. अटकेतील तिघांकडून पोलिसांनी एमडी, एलएसडी, चरस, गांजा आदी सहा प्रकारचे ड्रग्ज जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत 7 लाख 78 हजार 810 रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अटकेतल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 17 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याआधी देखील मिळाला आहे अमली पदार्थांचा साठा
ठाण्यात याआधी अनेकदा अमली पदार्थांचा मोठा साठा सापडला असून काही वर्षापूर्वी जवळपास वीस हजार कोटींचे ड्रग्ज हस्तगत करण्यात आले होते. त्यात चक्क ममता कुलकर्णी आणि तिचा पती हे आरोपी होते. त्यानंतर अनेकदा अशाच प्रकारे अमली पदार्थांचे मोठे साठे हे ठाणे पोलिसांना मिळालेले आहेत. मुंबईला लागून असलेले हे ठाणे शहर हे अमली पदार्थांच्या मागण्यासाठी काही काळासाठी गोडावून झाले होते आणि त्यामुळेच ठाणे पोलिसांना हे गोडावून उद्ध्वस्त करताना यश आले.
31 डिसेंबरच्या पार्टीची तयारी
पोलिसांनी हस्तगत केलेल्या ड्रग्जस 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी आणण्यात आले होते, असे तपासात निष्पन्न झाले असून पोलिसांची करडी नजर आता 31 डिसेंबरच्या पार्टीवर असणार आहे.