ठाणे - कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ठाण्यातील सेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या वतीने ठाण्यातील नागरिकांसाठी केवळ 100 रुपयात 7 प्रकारचा भाजीपाला देण्यात आला आहे. नागरिकांमध्ये अंतर ठेवून वर्तकनगर नाका या ठिकाणी भाजीची विक्री करण्यात आली. एकूण 5 हजार भोजनाच्या थाळ्या पोलीस कर्मचारी, तसेच बेघरांसाठी वितरित केल्या जात असल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा अनोखा उपक्रम राबवला आहे. फक्त १०० रुपयात भाजीपाला ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे काम सरनाईक यांनी केले आहे. १०० रुपयात १ किलो कांदे, १ किलो टोमॅटो, अर्धा किलो मिरची, १ किलो बटाटा, १ किलो कोबी, १ किलो शेवगा आदी भाज्याचे पॅकेट उपलब्ध करून दिले आहेत.
ठाणे आणि मीरा भाईंदर येथील नागरिकांना शेतकऱ्यांकडून थेट घरपोच भाजी पुरवली जाईल. एका प्रतिनिधीमार्फत आमच्याशी संपर्क साधावा आणि केवळ १०० रुपयात एकत्रित भाज्या असलेल्या किती पाकिटांची त्यांची गरज आहे ते आम्हास कळवण्याची विनंती आमदार नाईक यांनी येथील नागरिकांना केली आहे. आम्ही दर आठवड्यास भाजी सुपूर्द करू आणि नागरिकांच्या जीवनावश्य्क गरजा पूर्ण करण्याचा संपूर्ण प्रयत्न करू. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार कोरोनाच्या या युद्धजन्य परिस्थितीत नागरिकांना भाजीपाला घरपोच उपलब्ध करून देणे, हे मी माझे कर्तव्य समजतो, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.