ठाणे - मागील काही दिवसांपासून ठाणे भाजी मार्केट वादात सापडले आहे. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्यामुळे या ठिकाणी पालिकेने कारवाई देखील केली आहे. त्यातच आता एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आज (गुरुवार) सकाळी भाजी मार्केटमधील कचऱ्यातील कडीपत्याची मोठी जुडी घेऊन एक व्यक्ती शौचालयात जातो आणि मग बाहेर आल्यावर तीच जुडी 30 रुपये प्रमाणे नागरिकांना विकत असल्याचा प्रकार कॅमेरात कैद झाला आहे. या प्रकारामुळे भाजी मार्केटमध्ये घाणेरडा प्रकार समोर आला आला आहे.
हेही वाचा - महाराष्ट्रात गुरुवारी 9 हजार 895 नवीन कोरोना रुग्ण, 298 मृत्यू
एकीकडे कोरोना संकटामुळे स्वच्छता ठेवण्याचे आवाहन सर्व सरकारी पातळीवर सुरू आहे. अशात काही रुपये कमावण्यासाठी भाजी मार्केटमध्ये हमालीचे काम करणाऱ्या एका वक्तीने कचरा कुंडीमधील फेकलेला कडीपत्ता घेऊन चक्क सार्वजनिक शौचालायत गेला. त्यानंतर बाहेर येऊन त्याची विक्री केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे ठाणे भाजी मार्केटमध्ये अस्वच्छता आणि हलगर्जीपणा नागरिकांच्या जीवावर बेतू शकतो, हे चित्र पाहायला मिळाले आहे.
सध्या श्रावण महिना सुरू आहे. अशा वेळी देवपूजा आणि शाकाहारी आहार, यावर नागरिकांचा भर असतो. अशा वेळी भाजी मार्केटमधील हा धक्कादायक प्रकार नक्कीच धोक्याची घंटा आहे. हा संपूर्ण प्रकार ठाण्यातील एका नागरिकाने आज कॅमेरात कैद केला आणि अशा प्रकारांना रोखण्याची मागणी केली आहे.