ठाणे : सभास्थानी तलवार दाखवल्याने अखेर आज राज ठाकरे यांच्यावर ठाण्यातील नौपाडा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. काल दिनांक 13 एप्रिल रोजी ठाण्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राम गणेश गडकरी चौकात पार पडलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जाहीर सभेदरम्यान ( Raj Thackeray Uttar Sabha Thane ) भेट म्हणून दिलेली तलवार म्यानातून बाहेर काढत राज ठाकरे यांनी सर्वांना तलवार दाखवली होती. यासंदर्भात राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल होईल, अशी शंका राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात होती. ती अखेर खरी ठरली व नौपाडा पोलिसांनी भादंवि कायदा कलम 34 भारतीय हत्यार कायदा 1959 चे कलम 4 व 25 प्रमाणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मनसेचे ठाणे आणि पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव आणि ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह इतर सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला ( Case Filed Against Raj Thackeray ) आहे.
रस्त्यावर उतरायला लावू नका : दुसरीकडे मनसेने जर राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात देखील गुन्हा दाखल व्हायलाच हवा. तलवार दाखवणे ही एक प्रकारची संस्कृती आहे. त्यामुळे जर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरायला लावू नका, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे. राज्यातील सर्वच नेत्यांनी सभेत तलवारी घेतल्या आणि काढल्या आहेत. मग फक्त राज ठाकरे यांच्यावरच गुन्हा का? असा सवाल करत सरकार जाणून बुजून मनसेला टार्गेट करत असल्याचेही अविनाश जाधव यांनी ( Avinash Jadhav Demands To Police ) सांगितले.
शरद पवार यांच्यावर टीका : आव्हाड असे म्हणाले की, आमच्या नेत्याचा चेहरा कोंबडीच्या कुठल्या भागा सारखा दिसतो. मग आम्ही जर म्हणालो की, त्यांच्या नेत्यांचा चेहरा म्हशीचा कोणत्या भागा सारखा दिसतो? तर हे काय बोलणार? पण आम्ही अस बोलत नाही. कारण आमच्या संस्कृतीत ते बसत नाहीत, असेही ते म्हणाले.
फक्त तीन घटनांवर टीका : मुंब्रामध्ये आतापर्यंत दोन ते तीन घटना झाल्याचे आव्हाड म्हणाले. मात्र या दोन ते तीन घटनांमध्ये किती लोक मेले हे आव्हाडांना माहित नाही का? आणि फक्त दोन ते तीन म्हणतात मग आणखी किती घटना व्हायला पाहिजेत असे आव्हाड यांना वाटतंय. आम्ही अजून सव्वीस अकरा देखील विसरलो नाही, असे जाधव म्हणाले.
3 मे ची डेडलाईन पाळणार : राज साहेबांचा आदेश काहीही झालं तरी पाळला जाणार. जर ते म्हणाले की, भोंगे उतरणार नाही आणि डेसिबलची मर्यादा पाळा तर आम्ही देखील त्यांच्यासमोर भोंगे लावणार आणि डेसिबलच्या मर्यादेत भोंगे वाजवणारच, असा इशाराही त्यांनी दिला.