ठाणे - वाढीव विज बिलांनंतर राज्यात विविध पक्षांकडून आंदोलन करण्यात आली. मात्र त्यानंतरही सर्वसामान्य जनतेला वीजबिलातून सवलत मिळाली नाही. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी वीजबिलाच्या मुद्यावरून मनसेच्या वतीने २६ नोव्हेंबरला ठाण्यात सरकारच्या विरोधात मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चात मोठ्याप्रमाणात मनसैनिक सहभागी होणार होते. मात्र, पोलिसांनी ठाणे जिल्हा बंदीचे आदेश लागू केले आहेत. तसेच मोर्चाला परवानगीही नाकारली आहे. त्यामुळे मनसेच्या आंदोलनाला आता ब्रेक लागल्याचे चित्र आहे.
भरमसाठ वीजबिलाबाबत अनेक आंदोलने मनसेच्या वतीने करण्यात आली. प्रशासनाशी पत्रव्यवहारही करण्यात आला. मात्र उर्जामंत्री आणि शासनाने त्याची दाखल न घेता भरमसाठ आलेली बिले भरावीच लागतील. या फार्मानावर मनसेने निदर्शनेही केली. सर्वसामान्य जनतेचा आक्रोश शासन दरबारी पोहोचविण्यासाठी मनसेने जिल्ह्यात २६ नोव्हेंबरला भव्य मोर्चाचे आयोजन केले होते. हा मोर्चा कॅडबरी जंक्शन ते जिल्हाधिकारी कार्यालय असा नियोजित आहे. तर या मोर्च्यात मोठ्या संख्येने जिल्ह्याबाहेरील मनसैनिक उपस्थित राहणार होते. मात्र, आंदोलनापूर्वीच पोलिसांनी ठाण्यात जिल्हाबंदी लागू केली आहे. त्यामुळे मनसैनिक हे जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वीच त्यांना रोखण्यात येणार आहे.
मोर्च्याला परवानगी नाकारली-मनसेच्या मोर्च्याला वाढीव वीज बिलामुळे संतप्त झालेले नागरिक मोठ्या प्रमाणात सामील होणार आहेत. यामुळे कदाचित कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाणे पोलिसांनी जिल्हा बंदीचे आदेश जाहिर केले आहेत. जिल्हाधिकारी यांनीही याला मंजुरी दिली. कोरोनाचा काळ असल्याने जमावबंदी आहेच, दुसरीकडे पूर्वीपासूनच १४४ नियम लागू होत असल्याने ठाण्यात गर्दी करणे शक्य होणार नाही. त्यामुळे मनसेच्या नियोजित मोर्चाला ठाणे पोलिसांनी युक्ती लाऊन मनसेच्या मोर्चाला थेट जिल्हाबंदीचा ब्रेक लावल्याने मनसेचा मोर्चा निघणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मोर्चा निघणारच.... जिल्हाबंदी, नोटीसा अन्यायकारक-मनसे मनसेच्या नियोजित भव्य मोर्च्याबाबत मनसेचे ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांना पोलीस उपयुक्तांनी बोलावून घेतले होते. गुरुवारी ठाणे जिल्हाबंदी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी जाधव यांना दिली. तसेच मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारण्यातही आली. यावर जाधव यांनी संताप व्यक्त केला. तसेच आंदोलन केल्यास मनसैनिकांना नोटीस बजावण्यात येणार आहेत, हे सगळे अन्यायकारक आहे. यापूर्वी भाजपने अनेक मोर्चे काढले, त्याविरोधात कारवाई झाली नाही. मात्र, आता मनसे रस्त्यावर उतरत असतानाच अशा प्रकारचा अन्याय करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, कितीही दडपशाही झाली तरी मनसेचा मोर्चा हा निघणारच, असा दृढ विश्वास जाधव यांनी व्यक्त केला.