ठाणे - उल्हासनगरमधील आवतमल चौक झुलेलाल मंदीरसमोरील रोडवरून जाताना सोमवारी भरदिवसा तरुणाचा खून करण्यात आला होता. विशेष म्हणजे तीन ते चार महिन्यापूर्वी करण्यात आलेल्या खुनाचा बदला म्हणून त्या सेल्समनची दिवसाढवळ्या गळा चिरुन निषाद टोळीने हा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी संदिप निषाद आणि नूर अंसारी या मारेकऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
बशिष्ठ यादव हा सेल्समन सोमवारी दुपारी आवतमल चौक झुलेलाल मंदिरसमोरील रोडवरून पायी जात होता. यावेळी निषाद टोळीने यादवला भररस्त्यात गाठून त्याच्यावर तिक्ष्ण हत्याराने वार केले. या हल्ल्यात तो जागीच ठार झाला होता. त्यानंतर मंगळवारी सकाळी यादव कुटुंबीयानी बशिष्टचा पार्थिव ताब्यात घेऊन त्यांच्या आझादनगर निवासस्थानी नेला. मात्र जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा घेतला. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय जमला होता.
जनआक्रोश होण्याच्या धास्तीने पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल पाटील, धुला टेळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील जावळे, सुधाकर शीघ्र कृती दल असा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 24 तासांच्या आत आरोपींना बेड्या ठोकण्यात येणार असे आश्वासन पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे यांनी दिल्यावर बशिष्ठच्या पार्थिवावर अंतिमसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, मृत बशिष्ठ यादव याचा चुलत भाऊ बिपिन यादव याने निषाद टोळीतील सुंदरम निषाद याचा खून केला होता. त्या पूर्व वैमन्स्यातूनच निषाद टोळीने भररस्त्यात बशिष्ठ यादवला गाठून त्याचा निर्घृण खून केला. या खुनामागे प्रामुख्याने संदिप निषाद व नूर अंसारी ही नावे समोर आल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील जावळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन तडाके, उपनिरीक्षक संतोष म्हस्के, गुन्हे शोध प्रकटीकरणचे वसंत डोळे, अर्जुन मुत्तलगीरी, मिलिंद बोरसे, पी. एन. आव्हाड यांनी तपास करत आरोपी संदिप निषाद, नूर अंसारी या दोघांना शहाड पुलाखाली अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.