नवी मुंबई- कोरोना विषाणूमुळे सर्वत्र भयंकर परिस्थिती ओढवलेली असताना देखील नागरिक कोणत्या ना कोणत्या कारणासाठी बाहेर पडताना दिसत आहेत. संचारबंदीच्या काळात पनवेल व कळंबोलीमध्ये क्रिकेट खेळणाऱ्या व मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर पनवेल व कळंबोली पोलिसांनी कारवाई केली असून, क्रिकेट खेळणाऱ्या व्यक्तींना पनवेल शहर पोलिसांच्या माध्यमातून अटक करण्यात आले आहे.
संचारबंदी आणी लॉकडाऊनचे आदेश पायदळी तुडवून क्रिकेट खेळणाऱ्या तरुणांवर पनवेल शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. हे तरुण पनवेल परिसरातील तक्का विभागात राहणारे आहेत. रविवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या तरुणांमध्ये पनवेल महानगरपालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याचे समोर येत आहे.
सकाळी मॉर्निग वॉकसाठी बाहेर पडलेल्या रहिवाशांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. कळंबोली शहरातही मॉर्निग वॉकसाठी बाहेर पडलेल्या 35 नागरिकांवर कळंबोली पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये 4 महिला व 31 पुरुषांचा समावेश असून त्यांच्यावर कलम 188 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.