ठाणे - पोलीस असल्याची बतावणी करून टेम्पो चालकाला लुटणाऱ्या तीन मनसे पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे नवी मुंबईत ३ दिवसांनी दाखल होण्यापूर्वी असा खळबळजनक प्रकार समोर आल्याने मनसेच्या गोटात खळबळ उडाली आहे. तर अटक केलेले हे तिन्ही मनसे पदाधिकारी नवी मुंबईतले आहेत.
मनसे कामगार सेनेचे सरचिटणीस प्रशांत शिंदे, कोपरखैरणे शाखा अध्यक्ष मिथुन राजगे आणि हरिश्चंद्र पाष्टे असे अटक करण्यात आलेल्या मनसे सैनिकांची नावे आहेत. यातील चौथा आरोपी अद्याप फरार आहे.
टेम्पो चालकाला लुटून जीवे ठार मारण्याची धमकी
या सर्व जणांनी बुधवारी रात्री वाशीतल्या अरेंजा सर्कल चौकात अब्दुल हालीम चौधरी या टेम्पो चालकाला अडवले आणि पोलीस असल्याचे सांगून जबरदस्तीने त्याच्या खिशातून 400 रुपये हिसकावून घेतले. यानंतर त्यांनी टेम्पो चालकाला शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच चालकाचा मोबाईल घेऊन फोन पे द्वारे 800 रुपये आपल्या मोबाईलवर ट्रान्सफर करून घेतले. या सगळ्या प्रकारानंतर टेम्पो चालकाने वाशी पोलीस ठाणे गाठले आणि लुटणाऱ्यांविरोधात तक्रार नोंदवली.
चौघांवर जबरी चोरीचे गुन्हा
पोलिसांनी या चौघांवर जबरी चोरी तसेच पोलीस असल्याचा बनाव केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यात वाशी पोलिसांनी तिघा मनसे सैनिकांना कोपरखैरणेतून अटक केली आहे. चौथा आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
हेही वाचा - सीसीटीव्ही : धावत्या रेल्वेखाली जाणाऱ्या प्रवाशाचा आरपीएफ जवानामुळे वाचला जीव
हेही वाचा - वाढत्या वीजबिलावरून राज ठाकरे यांची राज्य सरकारवर टीका, म्हणाले...