ठाणे - विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना वाहतूक कोंडीचा चांगलाच फटका बसला आहे. प्रविण दरेकर यांना आपल्या गाड्यांचा ताफा सोडून चक्क लोकल ट्रेनने प्रवास करत कार्यक्रमाला जावे लागले. त्यामुळे लोकल ट्रेनची गर्दी आणि समस्या काय असतात, ते या नेते मंडळींना चांगलेच उमगले असेल.
हेही वाचा... महाविकास आघाडीचे सरकार खचावं म्हणूनच 'फोन टॅपिंग'
दिवा येथे पूर्व नियोजित कार्यक्रमासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना जायचे होते. यासाठी मुंबई ते ठाणे आणि ठाणे ते मुंब्रा बायपास त्यानंतर दिवा, असा प्रवास दरेकर यांना करायचा होता. मुंबई ते ठाणे ते आपल्या ताफ्यासहित आले. मात्र, त्यांना आधीच मुंबईच्या वाहतूक कोंडीमुळे उशीर झाला होता. त्यात ठाण्यात भाजप आमदार आणि नेते मंडळी त्यांच्या स्वागतासाठी उभे होते. प्रविण दरेकर नेते मंडळींजवळ पोहोचताच ठाणे ते दिवा मोठी वाहतूक कोंडी असल्याचे त्यांना समजले. त्यामुळे कोणताही पर्याय नसल्याने विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर आणि आमदार निरंजन डावखरे इतर नेते मंडळींसह धीम्या लोकलने दिव्याकडे निघाले.
हेही वाचा... एक रात्र भूतांसोबत... अंनिसचा अभिनव प्रयोग