नवी मुंबई - विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शनिवार) कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पनवेल आणि नवी मुंबईचा दौरा केला. सदर भागात भेट देऊन फडणवीस यांनी तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासंदर्भात रुग्णालय प्रशासन आणि महापालिका प्रशासनाशी चर्चा केली. यावेळी माध्यमांसोबत बोलताना त्यांनी, महाविकासआघाडी सरकारमध्ये समन्वयाचा अभाव दिसत आहे. त्यांनी आपापसातील समन्वय वाढावावा, असे फडणवीस यांनी म्हटले.
नवी मुंबई आणि पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढ आहेत. त्यातच आता ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. ही अत्यंत चिंतेची बाब आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका आणि पनवेल उपजिल्हा रुग्णालय आणि महानगरपालिका प्रशासनाकडून काय उपचार आणि उपाययोजना केल्या जात आहेत, याचा आढावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. नवी मुंबईचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या बदलीवरही त्यांनी ताशेरे ओढत आयुक्तांची बदली करणे चांगले नाही, सरकार आपले अपयश आयुक्तांच्या माथी मारत असल्याची शंका उपस्थित होत आहे, असे फडणवीस म्हणाले.
हेही वाचा - मुंबईत आज अतिवृष्टीचा इशारा; महापालिका सज्ज
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री नगरविकास मंत्री आहेत. त्यांना देखील बदल्यांबद्दल माहिती नव्हती. राज्यातील महाविकासआघाडीमध्ये समन्वय नाही. मंत्र्यांमध्ये समन्वय नाही, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे. लॉकडाऊनसारखे निर्णय शासनाने विचारपूर्वक घ्यावेत, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
शासकीय गाड्या ही सध्या प्राथमिकता नाही. काही दिवस मंत्री स्वतःच्या गाड्या वापरू शकतात. सरकारची प्राथमिकता काय, हे त्यांच्या लक्षात येत नाही. एकीकडे शासकीय कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नाहीत आणि दुसरीकडे गाड्या घ्यायच्या निर्णय. त्यामुळे सरकारचे प्राधान्य कशाला आहे, हे समजत नाही. याबाबत सरकारने कठोर भूमिका घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले. संपूर्ण कोविड काळात मुख्यमंत्री यांनी फक्त एक बैठक घेतली तेही 2 महिन्यांनी, असाही टोलाही फडणवीस यांनी लगावला.
हेही वाचा - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू
साखर उद्योगाला मदत करण्याची आवश्यकता आहे. केंद्रीय मंत्र्यांशी आम्ही चर्चा आम्ही केली असून केवळ आपल्या 2 ते 4 कारखान्यांला मदत करावी, हे योग्य नाही. निकष तयार करून त्यात जे बसतील, त्यांना आमच्या सरकारमध्ये मदत मिळाली, तसे या सरकारने निकष करून मदत करावी, असेही फडणवीस म्हणाले.
भाजपची जम्बो कार्यकारणी बनत असून, सर्वसमावेशक अशी कार्यकारणी आहे. त्यामुळे कोणाचीही नाराजी नाही, असेही फडणवीस नवी मुंबई महापालिका मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले. राज्यात कोरोना टेस्टिंगचे प्रमाण फार कमी आहे. 30 टक्के संक्रमणाचा दर आहे. म्हणून टेस्टिंग वाढवल्या पाहिजेत. टेस्टिंग वाढवले नाही, तर संक्रमण वाढत जाईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर एपीएमसी वाशी बाजार समितीचे संचलन करत असताना स्क्रिनिंग आणि रॅपिड टेस्टिंग होणे गरजेचे आहे. थर्मल टेस्टिंग केले गेले पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले.