नवी मुंबई - आजकालच्या 'मेट्रो' युगात प्रत्येकाला शरीर पिळदार व कमनीय असावे, असे वाटते. यामुळे आजकाल जिममध्ये जाणाऱ्यांचं प्रमाण वाढलंय.
नवी मुंबईत एक वेगळे चित्र अनुभवायला मिळत आहे. शहरातील उद्यानांमध्ये महापालिकेतर्फे अत्याधुनिक व्यायामाचे साहित्य बसवण्यात आले आहे. राज्यभरात तापमान खालावल्याने व्यायाम करण्यासाठी सर्व उद्यानांमध्ये नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. यामध्ये पुरुषांसोबत महिलांचं प्रमाणही वाढलंय. यामुळे उद्यानांमधील मोकळ्या जागेत व्यायामाचे नवीन पर्व अनुभवायला मिळतयं.
सिनेमाच्या प्रभावामुळे पीळदार शरीरयष्टी कमवण्याचे वेड सर्व वर्गांमध्ये आले. यानंतर जिममधील गर्दीत वाढ झाली. मात्र, अनेकांना परवडणारे नसते. त्यामुळे पालिकेने उद्यानांमध्ये बसवलेली व्यायाम साहित्य नागरिकांना वरदान ठरत आहेत. यामध्ये सायकलींग, एअर वाकॅर्स, रोईंग, चेस्ट प्रेस, आदी साहित्यांचा समावेश आहे. यामुळे सकाळ-सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी उद्यानांमध्ये येणाऱ्या नागरिकांचा खुल्या व्यायामशाळांकडे कल कमालीचा वाढलायं.
भरपूर व्यायाम आणि आहारावर तरुणाई अधिक भर देत असते. यातूनच अनेक ठिकाणी खासगी व्यायामशाळा उभ्या राहिल्या. व्यायामशाळेचे शुल्क, प्रशिक्षकाचे शुल्क आणि आहाराचा खर्च पेलणे अनेकांना शक्य नसते. पालिकेच्या खुल्या व्यायामशाळा मोफत असल्याने या नागरिकांपुढे नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. तसेच पैशांची बचत होत असल्याने अनेकजण खुल्या व्यायामशाळांचा पर्याय निवडू लागले आहेत.