ठाणे - ठाणे महापालिकेच्या ( thane municipal corporation ) सेवेत १ हजार ११३ सुरक्षा रक्षक असून त्यात पुरुष आणि महिलांचाही समावेश आहे. या सर्वानी आठवड्यातून एकदा दर शनिवारी परेड आणि पिटी करावी अशी सक्ती करण्यात आली होती. त्या संदर्भात नुकतेच एक परिपत्रकही सुरक्षा विभागाने काढले. विशेष म्हणजे त्यात सर्वांनी परेड करताना खाकी हाफ पॅन्ट आणि फुल बाह्याचे बनियान घालावे (Half pants and vest for parade ) असे सक्त आदेश देण्यात आले असल्याने महिला सुरक्षा रक्षकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. बुधवारी यापैकी काही महिला कर्मचाऱ्यांनी उपआयुक्त मुख्यालय यांची भेट घेतली. दरम्यान याबाबत आता आयुक्त डॉ. बिपीन शर्मा यांच्याकडे तक्रार करण्यात आली असल्याने या सक्तीच्या आदेशामुळे सुरक्षा अधिकारी मच्छिन्द्र थोरवे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत.
सुरक्षा रक्षक नेमण्याचा घेतला होता निर्णय - ठाणे महापालिका तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी चार वर्षांपूर्वी शहरांतील रस्ता रुंदीकरणाची आक्रमक मोहीम हाती घेतली होती . आयुक्त स्वतः रस्त्यावर उतरून मोहिमेवर देखरेख ठेवायचे. घोडबंदर सर्व्हिस रोडवरील अतिक्रमणे हटविण्याच्या कामात अडथळा आणणाऱ्या एका व्यक्तीसोबत आयुक्तांची झटापट झाली होती. आपल्या वाहनाने कार्यालयात येत असताना एका ठिकाणी अनधिकृत होर्डिंग उभारण्याचे प्रयत्न आयुक्तांच्या नजरेत आले होते. तिथेही आयुक्तांनी स्वतः उतरून हा गैरप्रकार रोखण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी सुध्दा बाचाबाची झाली होती. पोखरण रोड क्रमांक एक येथील काही धार्मिक स्थळांवर कारवाई केल्यानंतर संतप्त झालेल्या एका संघटनेने आयुक्तांच्या विरोधात आंदोलन करण्याचे प्रयत्न केले होते. त्याचमुळे ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी आणि आस्थापनांच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा रक्षक नेमण्याचा निर्णय ठाणे महानगरपालिका प्रशासनाने घेतला होता.
परेडचे आदेश - ठाणे महापालिका प्रशासनात सध्या १ हजाराहून अधिक सुरक्षा रक्षक आणि आरक्षक आहेत. यात पालिकेचे सुरक्षा रक्षक, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे कर्मचारी, सुरक्षा बोर्डाकडून पाठवण्यात आलेले सुरक्षा रक्षक कर्तव्यावर तैनात आहेत. यातही महिला कर्मचाऱ्यांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. दरम्यान पालिकेच्या सुरक्षा विभागाने शुक्रवार ३ जून रोजी एक कार्यालयीन आदेश काढला असून त्यात सुरक्षा रक्षक आणि जवानांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सक्षम बनवण्यासाठी अतिरिक्त आयुक्त २ यांच्या आदेशाने दर शनिवारी पिटी आणि परेडचे आयोजन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी शनिवारी दुसऱ्याच दिवशी ४ जून रोजी सकाळी ६.४५ सर्वानी हजार रहाण्याचे आदेश देण्यात आले होते. दरम्यान या आदेशामुळे महिला कर्मचारी संतप्त झाल्या आहेत.
महिला कर्मचारी संतप्त - परेडसाठी सकाळी ७ ते ७.४५ दरम्यान सर्व सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हाफ खाकी पॅन्ट, फुल बाह्याचे बनियान परिधान करावे, तर १५ मिनिटांच्या विश्रांती नंतर पिटी आणि परेडसाठी मात्र सरकारी खाकी फुल पॅन्ट, खाकी हाफ शर्ट असा दुसऱ्या ड्रेसकोड परिधान करावा असे आदेश आहेत. दुसरा कोणताही पोशाख आणि ड्रेस परिधान केल्यास कारवाई करण्यात येईल असे आदेश आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या महिला कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या ज्येष्ठ अधिकाऱ्याची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार केली.
आम्ही लगेच आदेश रद्द केला - दिनांक 3 जून रोजी हा अध्यादेश काढण्यात आला होता. मात्र काही तासांतच तो रद्द देखील करण्यात आला असून कोणाचा गैरसमज झाला असेल तर तो दूर करण्यात येईल. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून याबद्दल अधिक माहिती देण्यात येईल, असे मुख्य सुरक्षा अधिकारी मॅचिंद्र थोरवे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - Sanjay Raut Summoned : संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ; शिवडी न्यायालयाचे 4 जुलैला हजर राहण्याचे निर्देश