ठाणे - येणाऱ्या काळात एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रमांतर्गत ४ वर्षीय बीईडी एकत्रिकृत डिग्री असेल, असे एनसीटीईचे अध्यक्ष डॉ. सतबीर बेदी यांनी म्हटले आहे. ते अखिल भारतीय असोसिएशन ओएनपीटी आणि एनसीटीईच्या संयुक्त सहकार्याने देशातील मुलांचे शैक्षणिक उपक्रम सुधारण्यासाठी नारायणी सेवा संस्थेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय सेमिनारमध्ये बोलत होते.
जागतिक स्तरावर शिक्षक तयार करण्यासाठी नॅशनल काऊन्सिल टीचर्स एज्युकेशनच्यावतीने (एनसीटीई) काही महत्वाची पावले उचलण्यात आली आहेत. पुढील काळात खाजगी शैक्षणिक संस्थाना आणि सरकारी संस्थांना समन्वयाने काम करावे लागेल. आम्ही २०६० च्या दशकातील जगासाठी अध्यापक तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत. २२ लाख शिक्षक देशात तयार होत आहेत तर, दरवर्षी केवळ ३ लाख शिक्षक भरती होते. असे मत एनसीटीई अध्यक्ष डॉ. सतबीर बेदी यांनी व्यक्त केले आहे.
लोणावळा येथे २ दिवस सेमिनार सुरू राहणार आहेत. सेमिनारसाठी असोसिएशनचे डॉ. प्रेमचंद्र तिवारी, प्रकाश मिश्रा, संतोष गुप्ता, दिनेश सिंह यांनी देशभरातून आलेल्या अतिथिंची स्वागत केले. सेमिनारसाठी देशभरातील शिक्षण संस्था आणि शिक्षक सहभागी झाले आहेत.