ठाणे - पावसाळ्यातही ठाणे शहराच्या अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. ठाणे पालिकेचे स्वत: चे धरण नसल्यामुळे ठाणे शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्याच्या महापौर मिनाक्षी शिंदे यांना बिस्लेरी पाण्याच्या बाटल्यांचा एक बॉक्स भेट म्हणून पाठवला.
शाई धरण बांधण्याची मागणी अनेक वर्षे करुनही सत्ताधारी शिवसेना त्यावर कोणत्याही प्रकारची भूमिका घेत नाही. पाणीटंचाईवर सामान्य ठाणेकरांची ओरड सत्ताधार्यांच्या कानावर पडत नाही. महासभेत यावर चर्चा होऊन धरण बांधण्याचा ठोस निर्णय घेतला जात नाही. पिण्यासाठी पाणी नसल्यामुळे अनेकांना बिस्लेरीच्या पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र, ज्यांची दिवसाची कमाईच बिस्लेरी पाण्याच्या एका बाटलीएवढीच आहे त्यांनी काय करायचे? असा सवाल आव्हाड यांनी यावेळी उपस्थित केला.
महापौर मिनाक्षी शिंदे यांचा प्रवास हा गरीबीतून झाला आहे. त्यामुळे त्यांना गरीब ठाणेकरांच्या पाण्याच्या समस्येची जाण आहे. जेव्हा जेव्हा शिवसेनेने चुकीचे निर्णय घेतले आहेत. त्या-त्या वेळी मिनाक्षी शिंदे यांनी विरोध म्हणून आपली खुर्ची सोडली आहे. आज ठाण्यातील मायभगिनींच्या डोळ्यात पाण्यासाठी ‘पाणी’ येत आहे. याची जाणीव एक स्त्री म्हणून महापौरांना आहेच. त्यांच्या हृदयातील महिला ठाणेकरांच्या हितासाठी काम करणारी आहे. म्हणूनच त्यांचा एक भाऊ म्हणून आपण महापौरांना हा पाण्याचा बॉक्स भेट देऊन स्वतंत्र धरणाची मागणी करीत आहोत, असे यावेळी आ. आव्हाड यांनी सांगितले. विशेष म्हणजे, आ. आव्हाड यांनी स्वत: ठाणे महापालिका मुख्यालयात जाऊन पाण्याच्या बाटल्यांचा बॉक्स महापौरांना पाठवला.