ठाणे - मुंबईतील 500 चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्यात येत आहे. तसेच, नवी मुंबई पालिकेनेही हाच निर्णय घेतला आहे. मात्र, ठाणे शहरातील 500 चौरस फुट घरांचा मालमत्ता कर माफ करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. ठाणे पालिकेच्या सभागृहात याबाबत निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी करणारी लक्षवेधी येत्या महासभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मांडण्यात येणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते मिलींद पाटील आणि ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांनी दिली आहे.
मिलिंद पाटलांच्या या लक्षवेधीवर नजीब मुल्ला हे अनुमोदक आहेत. त्यांनी महापौर आणि आयुक्तांना लक्षवेधी मांडण्यासंदर्भात एक पत्र दिले आहे. बृहन्मुंबई आणि नवी मुंबई महानगर पालिकेने धोरणात्मक निर्णय घेऊन 500 चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ केला आहे. तसा निर्णय ठाणे महानगर पालिकेने घेण्याची गरज आहे. ठामपा हद्दीतील 500 चौ. फुटांचा मालमत्ता कर माफ केला, तर ठामपाला किमा 60 ते 70 कोटींच्या उत्पन्नाचे नुकसान सोसावे लागणार आहे. ठाणे मनपा शहरातील नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने कोट्यवधी रुपयांचे नवनवीन प्रकल्प, योजना राबवित असते. त्यामुळे 60 ते 70 कोटी रुपयांची तूट अगदीच सामान्य आहे. अशा प्रकारे 500 चौ. फुटांच्या घरांना करमाफी दिल्यास ते ठाणेकरांच्या हिताचेच ठरणार आहे. विशेष म्हणजे, 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सत्ताधारी शिवसेनेने 500 चौ. फुटांच्या घरांना करमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासन अद्यापही पूर्ण करण्यात आलेले नाही. त्यामुळे हा मुद्दा लक्षवेधी सूचनेद्वारे येत्या महासभेत मांडण्यात येणार आहे.