ठाणे - पाकिस्तानकडून भारतामध्ये वारंवार कुरापती केल्या जात आहेत. त्यामुळे आता पाकिस्तानाला धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे. पुलवामाच्या घटनेनंतर ठाणे-मुंब्रा-कौसावासीयांच्या मनात पाकिस्तानबद्दल कमालीचा द्वेष निर्माण झाला आहे. आमचे ठाणेकर, मुंब्रा-कौसावासीय पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन हटवण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने आम्हाला पाकिस्तान घुसण्याची परवानगी द्यावी; तशी शिफारस महापौरांनी केंद्र सरकारकडे करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक अश्रफ (शानू) पठाण यांनी केली आहे.
ठाणे मनपाच्या आज झालेल्या महासभेमध्ये पुलवामा घटनेचा निषेध करण्यात आला. यावेळी शिवसेनेकडून नरेश म्हस्के, विरोधी पक्षनेते मिलींद पाटील, राष्ट्रवादीचे नगरसेवक शानू पठाण आणि काँग्रेसचे विक्रांत चव्हाण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शानू पठाण यांनी आपल्या भाषणात पाकिस्तानी सरकारचे चांगलेच वाभाडे काढले.
पठाण म्हणाले, इस्लाममध्ये दहशतवादाला थारा नाही. त्यामुळे इस्लामच्या नावावर हिंसा करणार्यांना धडा शिकवण्याची वेळ आता आली आहे. पुलवामाच्या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन मुंब्रा-कौसावासियांनी स्वत:हून आपल्या भागात बंद पाळून रागाला वाट मोकळी करुन दिली. अनेक व्यापार्यांनी, रिक्षाचालकांनी बंदमध्ये सहभागी होऊन आपल्या भावना किती तीव्र आहेत, हे दाखवून दिले आहे. याच भावना आम्हा ठाणे-कळवा-मुंब्रा-कौसावासियांना पाकिस्तानात जाऊन व्यक्त करायच्या असल्याच्या भावना पठाण यांनी यावेळी व्यक्त केल्या.
पाकिस्तानला धडा शिकवण्याची तयारी आहे.. फक्त परवानगी द्या -
पाकिस्तान जर वारंवार अशा प्रकारच्या जीवघेण्या कारवाया करीत असेल तर पाकिस्तानला संपवणे गरजेचे आहे. त्यासाठी जीवावर उदार होऊन पाकिस्तानात जाण्याची आपली तयारी आहे. त्याची परवानगी केंद्र सरकारने द्यावी. तसेच, केंद्र सरकारने पाकिस्तानातून येणार्या वस्तूंवर बंदी घालून पाकिस्तानची आर्थिक नाकेंबदी करावी. पाकिस्तानात तयार होणार्या एकाही वस्तूला भारतामध्ये बाजारपेठ मिळणार नाही, याची दक्षता भारत सरकारने घेतली पाहिजे. तसेच, ठाण्याच्या महापौर म्हणून मिनाक्षी शिंदे यांनी ठाणे शहरात पाकिस्तानी वस्तूंची विक्री होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही शानू पठाण यांनी केले.
दरम्यान, पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आपण आदरांजली अर्पण करीत असून त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आपण सहभागी असल्याच्या भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.