ठाणे गणेशोत्सवानंतर ओढ लागते ती नवरात्रोत्सवाची. कोविड काळाच्या दोन वर्षानंतर गणेशोत्वसारखाच यंदा नवरात्रोत्सव देखील निर्बंधमुक्त साजरा होणार असल्याने नवरात्र मंडळ देखील जय्यत तयारीला लागलेले पाहायला मिळत आहेत. ठाण्यातील प्रसिद्ध असलेल्या आणि धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरु केलेल्या टेंभी नाका नवरात्रौत्सव मंडळाने देखील तयारीला सुरुवात केली असुन यंदाचा नवरात्र उत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार आहे. कसा सुरु झाला आनंद दिघे यांचा नवरात्र उत्सव, काय आहे या मागचा इतिहास जाणून घेणार आहे.
१९७८ पहिला नवरात्र साजरा १९७८ साली आनंद दिघे यांनी टेंभी नाका याठिकाणी या नवरात्र उत्साहाला सुरुवात केली. आणि अल्पावधीतच या उत्सवाची प्रचिती ठाणे शहरापूर्तीच मर्यादित न राहता महाराष्ट्रासह महाराष्ट्राच्या बाहेर पोहोचली. त्याकाळी ठाणे शहरातील टेंभी नाका या परिसरात गुजराती, मारवाडी हा व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांनी उकच्भ्रू ठिकाणी नवरात्र उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. गरबा, दांडियाच्या आयोजनाला सुरुवात केली. मात्र सर्वसामान्य ठाणेकर व गोरगरिबांना गरबऱ्याचा आणि नवरात्र उत्सवाचा आनंद घेण्यासाठी त्यांची त्याठिकाणी अडवणूक केली जात होती. हीच बाब आनंद दिघे यांना खटकली आणि त्यांनी टेंभी नाका याठिकाणी नवरात्र उत्सव साजरा करून याठिकाणी गरबा, दांडियाच आयोजन करण्याचं ठरवलं. १९७८ आनंद दिघे यांनी पहिला नवरात्र साजरा केला. आनंद दिघे यांनी भरवलेल्या गरब्यात पहिल्याच वर्षी हजारो दांडिया रसिकांनी हजेरी लावली.
भाविकांची गर्दी टेंभी नाक्यावरील दांडियाची चर्चा मुंबई आणि इतर शहरांपर्यंत पोहोचली. त्याकाळी कोणतेही निर्बंध नसल्याने गरबा रसिकांसाठी सकाळी ६ वाजेपर्यंत दांडिया सुरु असायचा. लालबागच्या राजाच दर्शन घेण्यासाठी आता जेवढी भाविकांची गर्दी असते. त्याहून जास्त गर्दी आनंद दिघे यांच्या टेंभी नाक्यावरील देवीच्या दर्शनाला असायची. आनंद दिघे त्याकाळी शिवसेचे जिल्हा प्रमुख असल्याने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह मोठं मोठे नेते या उत्सवाला भेट देत होते. यादरम्यान मोठी जत्रा देखील या ठिकाणी भरत होती, तशीच जत्रा आत्ता देखील नवरात्र उत्सवा दरम्यान या ठिकाणी भरलेली पाहायला मिळते. या जत्रेत लाखो भाविक येत असतात. नवरात्र उत्सवात गरब्या दरम्यान ईतर ठिकाणी भांडण, हाणामारी, आणि छेडछाडीच्या घटना घडत होत्या. मात्र आनंद दिघे यांचा ठाण्यात दरारा असल्याने याठिकाणी कोणताही गैरप्रकार करण्याची कोणाची हिंमत नसायची, अशा बऱ्याचशा आठवणी आनंद दिघे यांच्यासोबत काम करणारे त्यांचे सहकारी आणि कार्यकर्ते सांगतात.
यंदा साकारणार शिखर मंदिर धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या टेंभी नाका येथील नवरात्र उत्सवाचा वारसा आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आनंद दिघे यांच्या निधनानंतर सातत्याने पुढे नेत आहेत. टेंभी नाका नवरात्र मंडळाचे यंदाच 46 वा वर्ष आहे. यांदा नवरात्र उत्सवसाठी हिमाचल प्रदेश मधील आत्तापर्यंतच्या काळातील सर्वात उंच मंदिर म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिखर मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येत आहे. देखावे साकारणारे प्रसिद्ध कलाकार अमन विधाते हे शिखर मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी साकारत आहेत. अमन विधाते यांना चौथ्यांदा या ठिकाणी संधी मिळाल्याने यंदाचा मंदिर कसं भव्य दिव्य दिसेल, यासाठी आपण पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
यंदाचा उत्सव मोठा धर्मवीर आनंद दिघे यांच्या ठाण्याची दुर्गेश्वरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवीकडे दरवर्षी लाखो भाविक साकडं घालण्यासाठी आणि दर्शनासाठी येत असतात. मात्र कोविड निर्बंधांमुळे गेल्या दोन वर्ष भाविकांना देवीचे दर्शन घेता आलं नव्हतं. मात्र यंदा निर्बंध मुक्त नवरात्र उत्सव साजरा होत असल्याने यंदा लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे.