ठाणे - राज्यात मुंबई, पुणे आणि ठाणे या भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाटत आहे. त्यामुळे या शहरात लॉकडाऊन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेच परप्रांतीय कामगारांमध्ये अस्वस्थता वाढू लागली आहे. याचा परिणाम म्हणून ठाण्यातील काही परप्रांतीय कामगारांनी कंटेनरमधून गावाकडे परतण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे या 47 कामगारांचा गावी जाण्याचा प्रयत्न फसला आहे.
भिवंडी तालुक्यातील राहनाळ, वळ ग्रामपंचायत हद्दीतील सुमारे 47 कामगार कंटेनरमधून गैरमार्गाने उत्तर प्रदेश येथे जाणार आहे, याची माहिती भिवंडी पोलीस नियंत्रण कक्षास मिळाली. त्यानंतर त्यांनी तत्काळ नारपोली पोलीस ठाण्यास याची माहिती दिली. या माहितीच्या आधारे मानकोली नाका या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक मारोती कारवार यांच्यासह वाहतूक पोलिसांनी नाकाबंदी केली. पोलिसांनी रात्री साडेदहाच्या सुमारास एक कंटेनर मानकोली नाका येथे आल्यावर पकडला. या कंटेनरची तपासणी केली असता, त्यात 47 कामगार दाटीवाटीने बसलेले आढळून आले.
पोलिसांनी या प्रकरणी कंटेनरचे दोन्ही चालकांना ताब्यात घेऊन कंटेनर अंजुरफाटा या ठिकाणी आणला. यातील सर्व कामगारांना बाहेर काढून त्यांची नोंद केली. तसेच त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली. दोन्ही चालकांना ताब्यात घेत त्यांच्यावर नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.