ठाणे - कोरोनाच्या काळात जीव धोक्यात घालून अंत्यसंस्कार करणाऱ्यांवरच आता बेकारीची कुऱ्हाड कोसळल्याने संघर्षाला सुरुवात झाली आहे. ठाण्यातील जवाहरबाग स्मशानभूमीत गेले सहा महिने एकूण साठ कंत्राटी कामगार नेमण्यात आले होते. स्वतःचा जीव धोक्यात घालून ते तीन पाळ्यांमध्ये काम करत होते. या सर्वांनी आपले कर्तव्य चोख बजावले. परंतु आता त्यांना तडकाफडकी कामावरून काढण्याचे आदेश कंत्राटदाराने दिले आहेत.
केवळ एक मेसेज पाठवून उद्यापासून कामावर न येण्याचे त्यांना सांगण्यात आले. यासाठी आज मनसेचे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांनी जव्हारबाग स्मशानभूमीच्या दारात ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. रवींद्र मोरे यांनी याबाबत कंत्राटदाराला फैलावर घेतल्यानंतर हा आदेश आरोग्य अधिकाऱ्यांनी दिल्याचे कारण त्याने पुढे केले. मात्र आरोग्य अधिकाऱ्यांनी असे कोणतेही आदेश दिले नसल्याचे समोर आले. त्यामुळे कंत्राटदाराचे पितळ उघडे पडले आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना त्वरित कामावर घेऊन कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी मोरे यांनी केली. यादरम्यान, मृतदेहांना स्मशानभूमीत घेतले जाणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
वादाच्या भोवऱ्यात स्मशानभूमी
ठाण्यातील सर्वात जुनी जवाहरबाग स्मशान भूमी नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिलेली आहे. या आधी सुद्धा या ठिकाणी चिमणीची उंची कमी असल्यामुळे वाद निर्माण झाला होता. स्थानिकांनी प्रदुषण होत असल्याचे कारण देत विरोध केला होता. त्या विरोधानंतर महानगरपालिकेला नवीन चिमणी लावावी लागली होती. आता कर्मचाऱ्यांच्या या अचानक उद्भवलेल्या वादामुळे पुन्हा एकदा जवाहर बाग स्मशानभूमी वादात सापडली आहे.