ठाणे - मनसेने काढलेल्या विराट मोर्चाला पोलिसांनी ठाण्यात अडवल्याने मोठा वाद निर्माण झाला. लॉकडाऊन काळात सामान्यांना आलेल्या अधिकच्या वीज बिलांविरोधात मनसेने दंड थोपटले आहेत. आज ठाण्यातील कॅडबरी जंक्शन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत एका विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो मनसैनिक आणि सामान्य ठाणेकर या मोर्चात सामील झाल्याने रस्ते मनसेच्या झेंड्यानी फुलून गेले होते. यावेळी काहीकाळ पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मनसेच्या पदाधिकाऱयांसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी बजावल्या होत्या नोटिसा -
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून सर्व प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांना कालच 149 अंतर्गत नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. ठाण्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल असे कारण देत या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती. तरीही नागरिकांच्या हितासाठी मनसेने हा मोर्चा काढलाच व पोलिसांनी त्याला अडवत जिल्हाध्यक्ष अविनाश जाधवांसह सहा प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांची धरपकड केली.
राज्यातील उद्धव ठाकरे सरकारला नागरिकांच्या समस्यांचे सोयरे सुतक नसून, गरिबांचे खिसे रिकामे केले जात आहेत, असे अविनाश जाधव म्हणाले. आधीच रोजगार नाही त्यात ही वीजबिलांची बलामत लोकांच्या माथी मारत सरकारने खेळ चालवला असून, मनसे याला सडेतोड उत्तर देईल, असा इशारा त्यांनी दिला.
पोलिसांचा चोख बंदोबस्त -
काल रात्रीपासूनच ठाणे पोलिसांनी हा मोर्चा रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या होत्या. यासाठी राज्य सुरक्षा बलाची टीम तैनात करण्यात आली होती. मनसेच्या इतर कार्यकर्त्यांना जिल्हाबंदी केली होती. ठाण्यातील मुख्य कार्यकर्त्यांना नोटिसा देखील बजावल्या होत्या. एवढं सगळं करुन देखील मनसेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात मध्यवर्ती शाखेत जमा झाल्यावर पोलिसांनी दोन्ही बाजूंनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. नंतर काही अंतरावरती त्यांना ताब्यात घेतले.
हेही वाचा - गडचिरोलीत माओवाद्यांचा बंद : माओवाद्यांनी रस्त्यावर झाडे तोडून बस अडवली
हेही वाचा - मराठा क्रांती मोर्चा आंदोलन : मराठा आरक्षणाशिवाय सुरू झालेल्या अकरावी प्रवेश प्रक्रियेविरोधात निषेध