ठाणे - कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले मनसेचे एकमेव आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांची कार पुलावरून थेट रेल्वे रुळावर कोसळल्याची घटना घडली. या अपघातामुळे दिवा - पनवेल रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
हेही वाचा - मुंबई महापालिकेची थकीत करवसुलीसाठी बिल्डरांवर मेहरबानी, बांधकाम करात सवलत
या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, कारचा चक्काचूर झाला आहे. फोर्ड कंपनीची 'मुश्तांग' ची (एमएच ०५ - सीव्ही ३३३३) ही कार असून सुमारे ७५ लाख रुपये या कारची किंमत असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मनसे आमदार राजू पाटील यांचा कार चालक रात्री कल्याण - शीळ मार्गावरील एका पेट्रोल पंपावर कारमध्ये पेट्रोल भरून पुन्हा पलावा सिटीमध्ये त्यांच्या घराकडे जात होते. यावेळी पलावा सिटीजवळील रेल्वे उड्डाणपुलावर कार चालकाचे नियंत्रण सुटून कार थेट दिवा - पनवेल रेल्वे रुळावर कोसळली. यावेळी कुठलीही रेल्वे तिथून जात नव्हती. यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, कार चालकाने वेळीच कारमधून उडी मारल्याने तो बचावला असून या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही.
हेही वाचा - विक्रोळीत शिवसेना पदाधिकारी शेखर जाधव यांच्यावर गोळीबार
सुमारे ७५ लाख रुपयांच्या कारचा चक्काचूर झाला आहे. आमदार राजू पाटील यांचा मुलगा आदित्य याने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.