ठाणे - स्मार्ट सिटी उपक्रमाअंतर्गत लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीपैकी 70 टक्के सीसीटीव्ही बंद असून येत्या आठ दिवसात ठाण्यातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे सुरू झाले नाही. तर त्या सर्व कॅमेऱ्यांची अंत्ययात्रा काढेन, असा धमकीवजा इशारा मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पालिका आयुक्तांना दिला.
स्मार्ट सिटीची संकल्पना राबविताना ठाणे महानगरपालिकेने संपूर्ण शहरात शेकडो सीसीटीव्ही कॅमेरे बसवले परंतु आत्तापासूनच यातील 70 टक्के कॅमेरे बंदच असल्याचा गौप्यस्फोट अविनाश जाधव यांनी केला. हे कॅमेरे विकत घेताना आपल्याच माणसांना टेंडर देऊन आपली टक्केवारी त्यातून काढून मोठा भ्रष्टाचार केला गेला. परंतु आता त्याच्या देखभालीकडे मात्र, कोणीच लक्ष देत नसल्याचे ते म्हणाले. नागरिक भरत असलेल्या करातून हा सर्व भ्रष्टाचार होत असल्याने आपण ते मुळीच खपवून घेणार नाही, असे ते म्हणाले. येत्या आठ दिवसात पालिका आयुक्तांनी आदेश देऊन सर्व कॅमेरे दुरुस्त करून घ्यावेत अन्यथा आपण त्याची अंत्ययात्रा काढू, असा धमकीवजा इशारा त्यांनी दिला आहे.