मीरा भाईंदर (ठाणे) - भाईंदर पश्चिमेच्या गणेश देवल येथील समाज मंदिरात दारुड्यांनी धिंगाणा करत तृतीयपंथासोबत अश्लिल नृत्य केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर पालिका प्रशासन समाज मंदिरात, असामाजिक काम करणाऱ्याविरोधात कोणती कारवाई करणार असा प्रश्न स्थानिक नागरिकांमधून विचारला जात आहे.
समाज मंदिराचा होतोय दुरूपयोग
पालिका प्रशासन लाखो रुपयांचा निधी खर्च करून समाज मंदिर बांधते. समाजाच्या कल्याणासाठी वापरण्यात येणाऱ्या या समाज मंदिरात असे घाणेरडे प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे. दारुड्यांचा तृतीयपंथीयासोबत नृत्य करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये नृत्य करत एक व्यक्ती पैशांची उधळपट्टी करताना पाहायला मिळत आहे. समाज मंदिरातील पालिकेच्या सामानाचे देखील या तळीरामांनी नुकसान केले. मात्र, पोलीस आणि पालिका प्रशासनाने यावर अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही.
स्थानिक नागरिकांकडून कारवाईची मागणी
भाईंदर पश्चिमेला गणेश देवल नगर परिसरात पालिकेच्या माध्यमातून समाज मंदिर बांधण्यात आले. यात तळ मजल्यावर हॉल असून पहिल्या मजल्यावर ग्रंथालय बनवण्यात आले आहे. सदर घटना १ जानेवारीला घडली. परिसरातील एक व्यक्तीने हा व्हिडीओ काढून सदर प्रकरण उघडकीस आणले. नेमके या समाज मंदिराची जबाबदारी ज्यांना दिली आहे, त्यांच्यावर कारवाई कधी होणार? या तळीरामांवर कारवाई कोण करणार हा प्रश्न स्थानिक नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
स्थानिक नगरसेवकाची आयुक्तांकडे तक्रार
स्थानिक नगरसेवक यांच्याशी संपर्क साधला असता, नगरसेवक दरोगा पांडे म्हणाले की, सदर घटना मला कळताच मी रितसर मनपा आयुक्त डॉ. विजय राठोड यांच्याकडे तक्रार केली आहे. संबंधित व्यक्तींवर कारवाई करा, अशी मागणी यात केली आहे.