मीरा भाईंदर(ठाणे) - राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्य सरकारकडून 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत जनतेला सहभाग होण्यासाठी बक्षीस योजनेचे मीरा भाईंदर महापालिकेकडून आयोजन करण्यात येत आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमेची सुरुवात केली आहे. ही योजना राज्यभरात १५ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबरपर्यंत राबविण्यात येत आहे. या मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी बक्षीस योजना सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थी, पालक व नागरिकांना 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या विषयावर निबंध, पोस्टर, मेसेज व शॉर्ट फिल्म आदी तयार करून प्रशासनाकडे जमा कराव्या लागणार आहेत. हे जनजागृतीसाठी उपयुक्त ठरणारे साहित्य प्रशिक्षकांकडून तपासण्यात येणार आहे. विजेत्यांची यादी राज्य सरकारकडून प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
असे आहे बक्षिसाचे स्वरुप-
मीरा भाईंदर महापालिकेकडून विजेत्यांना बक्षीस व ढाल देण्यात येणार आहे. बक्षिसाचे स्वरुप राज्यस्तर, जिल्हास्तर, महानगरपालिकास्तर, आमदार मतदारसंघ स्तर असे असणार आहे. प्रथम पारितोषिक १० हजार व इतर १२ व्यक्तींना बक्षिसे देण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी नोडल अधिकारी म्हणून जयश्री भोईर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मोहिमेत सहभागी होण्यासाठी ssambmc07@gmail.com या मेल आयडीवर संपर्क साधता येईल, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.