मीरा भाईंदर(ठाणे)- मीरा भाईंदर पालिकेच्या चार प्रभागांच्या समिती सभापतिपदासाठी मंगळवारी (२७ ऑक्टोबर ) निवडणूक होणार आहे. सत्तारुढ भाजपने निवडणुकीपूर्वी इतर दोन प्रभाग समित्यांवर बिनविरोध निवडून येत झेंडा फडकविला आहे. महापालिकेमध्ये एकूण सहा प्रभाग समित्या आहेत.
महापाालिकेच्या प्रभाग समितीच्या सभापतीपदाची ३१ मार्चला मुदत संपुष्टात आली. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही निवडणूक घेण्यात आली नव्हती. उद्या निवडणुकीच्या कामकाजासाठी मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर हे पीठासीन अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत. कोरोनाचा प्रार्दुभाव असल्याने ही निवडणूक ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. महापालिकेमध्ये एकूण सहा प्रभाग समित्या आहेत. यामधील प्रभाग समिती दोनमधून रक्षा सतीश भूपतापी तर प्रभाग समितीसहा मधून सचिन केसरीनाथ म्हात्रे हे बिनविरोध निवडून आले आहेत.
अशी होणार प्रभाग समित्यांमध्ये लढत-
मीरा भाईंदर पालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. गेल्यावेळी सहापैकी एका प्रभाग समितीवर शिवसेनेच्या तारा घरत निवडून आल्या होत्या. उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या प्रभाग एकमध्ये भाजपच्या वैशाली रकवी आणि शिवसेनेच्या हेलन जॉर्जी गोविंद यांच्यात लढत होणार आहे. प्रभाग तीनमध्ये भाजपच्या मीना कांगणे आणि सेनेच्या अर्चना अरुण कदम यांच्यात लढत होणार आहे.
प्रभाग समिती चारमध्ये भाजपचे दौलत गजरे आणि काँग्रेच्या गीता परदेशी यांच्यात लढत होत आहे. प्रभाग पाचमध्ये भाजपच्या हेतल परमार आणि काँग्रेसचे शेख अश्रफ मोहम्मद इब्राहिम यांच्यात थेट लढत होणार आहे.
भाजपला चारही प्रभाग समित्या ताब्यात येण्याचा विश्वास
मीरा भाईंदर महानगरपालिकेचे उपमहापौर हसमुख गेहलोत ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाले, की आमची महापालिकेत सत्ता आहे. दोन प्रभाग समितीवर भाजपच्या दोन उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे उर्वरित चार प्रभाग समितीवर भाजपचा झेंडा फडकणार, हा आम्हाला ठाम विश्वास आहे.