ठाणे (मिरा भाईंदर) - मिरा-भाईंदरमध्ये परिवहन सेवा महानगरपालिकेने सुचविलेल्या बस मार्गावर उद्यापासून 10 बसगाड्यांसह सुरू करण्यात येणार आहेत. तर उर्वरित अन्य मार्गावर येत्या चार दिवसानंतर परिवहन सेवा सुरळीतपणे सुरू केली जाणार असल्याचे मनपा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. परिवहन सेवेचा ईटीव्ही भारतने पाठपुरावा केला होता. अखेर उद्यापासून पाच मार्गावर बस सेवा सुरू होणार असल्याची माहिती मनपा उपायुक्त अजित मुठे यांनी ईटीव्ही भारतला दिली.
मिरा-भाईंदर शहरातील टाळेबंदी काढल्यानंतरदेखील परिवहन सेवा सुरू न झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. तर दुसरीकडे रिक्षा चालकांनी मनमानीपणे दर आकारीत प्रवाशांची लूट चालविली आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन सेवा सुरू करण्यासाठी महापौर जोत्स्ना हसनाळे, उपमहापौर हसमुख गहलोत, सभागृह नेते प्रशांत दळवी,आयुक्त डॉ. विजय राठोड, उपायुक्त अजित मुठे, विधी अधिकारी सई वडके, भागिरथी कंपनीचे संचालक मनोहर सकपाळ आणि सागर सकपाळ यांची बुधवारी बैठक झाली. या बैठकीत ठेकेदारासोबत पुरवणी करारनामा करण्यात आला.
बसगाड्या थांबविण्याचा प्रयत्न केल्यास एकतर्फी करार रद्द करण्याचा इशारा-
उद्यापासून महानगरपालिकेने सुचविलेल्या बस मार्गावर 10 बसस सुरू करण्याचे तसेच 28 सप्टेंबरपासून महापालिकेने सुचविलेल्या अन्य बस मार्गावर बस नियमित सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. ही बस सेवा अखंडीत चालू ठेवण्याचे ठेकेदाराने मान्य केले आहे. इतकेच नव्हे तर महापालिकेकडून देयक वेळेत अदा न झाल्यास बसगाड्या थांबविण्यात येणार नसल्याचे ठेकेदाराने मान्य केले आहे. मात्र, बस ऑपरेटरने बसगाड्या थांबविण्याचा प्रयत्न केल्यास या कंपनीसोबत झालेला करार महानगरपालिका एकतर्फी रद्द करील, असा इशारा उपायुक्त अजित मुठे यांनी या ठेकेदारास दिला आहे.
सत्तारुढ भाजप आणि महानगरपालिका प्रशासनाच्या यशस्वी मध्यस्थीमुळे परिवहन सेवा सुरू होत आहे. मिरा-भाईंदरवासियांना एक चांगलाच दिलासा मिळणार असल्याचे उपमहापौर हसमुख गहलोत यांनी सांगितले आहे.
कोणत्या मार्गावर उद्या पासून बस धावणार?
भाईंदर पूर्व ते ठाणे, मिरारोड पूर्व ते ठाणे, भाईंदर पश्चिम ते उत्तन, भाईंदर पूर्व ते बोरिवली, भाईंदर पश्चिम ते चौक अशा एकूण पाच मार्गावर उद्यापासून बस धावणार आहे.