ठाणे - महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आरोग्य कर्मचाऱ्यांनी अधिष्ठातांना घेराव घालून निषेध व्यक्त केला. जवळपास ५० नर्स, वॉर्ड बॉय आणि अन्य कर्मचाऱ्यांना वरिष्ठांकडून त्रास होत असल्याने वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी हे पाऊल उचलल्याची माहिती मिळत आहे.
कर्मचाऱ्यांना कामावरून घरी जाण्यासाठी वाहन व्यवस्था मिळत नाहीय. तसेच कर्तव्यावर असताना नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना देखील योग्य सुविधा देण्यात येत नसल्याने रुग्णालयातील कर्मचारी आक्रमक झाले. याचा निषेध नोंदवण्यासाठी त्यांनी अधिष्ठाता डॉ. प्रतिभा सावंत यांना घेराव घातला.
यामुळे जवळपास अर्धा तास काम बंद आंदोलन करण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या आक्रमकतेमुळे रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण होते. डॉ. सावंत यांनी आंदोलांकर्त्यांशी चर्चा करून मागण्यांचे लेखी निवेदन देण्यास सांगितले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी मागण्यांचे निवेदन देऊन आंदोलन स्थगित केले.