मुंबई - संपूर्ण जगात कोरोना व्हायरसचे थैमान सुरु असून आज होळीच्या सणावर देखील त्याचे सावट होते. परंतु एवढे असून देखील दरवर्षी होणारी मराठी कलाकारांची होळी होणार की, नाही याबद्दल साशंकता होती. परंतु समाजात एक चांगला संदेश देण्यासाठी हे सर्व कलाकार आज एकवटले होते. सालाबादप्रमाणे याही वर्षी ठाण्याच्या वंदना सिनेमा येथे मराठी कलाकारांनी एकत्र येऊन रंगपंचमी साजरी केली.
नैसर्गिक रंगाने एकमेकांना रंग लावून होळी करण्यात आली कोरोना वायरस दूर व्हावा महाराष्ट्रातील इडा पिडा दूर व्हावी, असे गाऱ्हाणे मालवणी भाषेत घालण्यात आले. सर्व जातीभेद विसरून यावेळी दिग्दर्शक विजू माने, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अभिजीत चव्हाणसह मराठी कलाकार एकमेकांना रंग लावताना दिसले. यावेळी पर्यावरण संस्थे तर्फे भाज्या आणि फुलांपासून तयार करण्यात आलेले नैसर्गिक रंग वापरण्यात आल्याचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक अभिनेते विजू माने यांनी सांगितले.