ठाणे - निवडणुकीच्या निकालानंतर राज्याचे मुख्यमंत्रीपद कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यंदा शिवसेना आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याच्या तयारीत आहे. यासाठी ठाकरे कुटुंबीयांमधील आदित्य हे पहिल्यांदाच निवडणूक लढवून विधानसभेवर गेले आहेत. आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी, पक्षांतर्गत हालचालींना वेग आला असतानाच शिवसेनेकडून 'माझा आमदार; माझा मुख्यमंत्री' ही मोहीम करण्यात आल्याचे चित्र आहे.
आदित्य ठाकरे हे मुख्य मंत्री बनावे असे सर्व युवा पिढीला वाटत असल्याची भावना युवा सेना सरचिटणीस पूर्वेश सरनाईक यांनी बोलून दाखवली आहे. यासंबंधी त्यांनी ट्वीट केले असून, आमचा आमदार हाच भविष्यातील मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा केला आहे.
परंतु, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व अमित शाह मिळून कोणता निर्णय घेतील, त्यावर सर्व अवलंबून आहे, असे ते म्हणाले. पण खऱ्या अर्थाने आदित्य ठाकरे हे महाराष्ट्रचे मुख्यमंत्री झाले पाहिजे, अशी आमची अपेक्षा असल्याचे पूर्वेश सरनाईक यांनी मत व्यक्त केले.